मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी झाली. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास यांनी जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांचा मुद्दा मांडत चौकशीची मागणी केली. यावेळी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. जरांगे यांच्या आंदोलनाच्या चौकशीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. यावर दानवे यांनी भूमिका मांडताना भाजपवर गंभीर आरोप केला.

‘मनोज जरांगे पाटील यांनी स्पेसिफिक (फक्त ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. परंतु मागचं सगळं दोन चार महिन्यांचं आंदोलन बघितलं तर जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाहीत. आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केलेले नाहीत. मग फक्त देवेंद्र फडणवीसांवरच का आरोप केले?’, असा प्रश्न विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला.
‘जरांगे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आरोप केलेत. त्यामुळे याची चौकशीच झालीच पाहिजे. कारण मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं पाहता आजही त्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. हा विश्वास कमी जास्त असू शकतो’, असं म्हणत दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला.
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगेंना विश्वास नाही. तसंच यात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. जातीयवादावर मी बोलणार नाही. पण यामुळे जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी. जरांगे यांनी ज्यांची नावं घेतली त्या सर्वांचे कॉल डिटेल्स तपासावे. कोणा-कोणाचे फोन आले. जरांगेंचे सहकारी कोणा-कोणाला भेटले. त्यांनी कोणा-कोणाला फोन केले? याची चौकशी होऊ द्या. एसआयटीची कार्यकक्षा वाढवावी’, अशी मागणी दानवे यांनी केली.
‘मनोज जरांगे पाटील आंदोलनाचा आदर करावा लागेल. मागणी विषय वेगळा आहे. पण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जर भाजप मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल तर मला त्यांची भूमिका मांडावी लागेल. जरांगे पाटील यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय’, असा आरोप दानवे यांनी केला.
‘भाजप मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. यावेळी सत्ताधारी आणिविरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये गदारोळ झाला. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दानवेंचं हे वाक्य सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकलं. कारण सत्ताधारी पक्षाच्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता, असं यावेळी निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.