नांदेड: माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला पहिला धक्का बसला आहे. काँग्रेसचे ५५ माजी नगरसेवकांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आयटीएम कॉलेजमध्ये पार पडलेल्या बैठकी दरम्यान माजी नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
भाजप जिल्हाध्यक्षकांच्या अनुपस्थित प्रवेश सोहळा
खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र या प्रवेशाला भाजपाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष हे हजर नव्हते.आपण धार्मिक कार्यक्रमात असल्यामुळे या पक्ष सोहळ्याला उपस्थित राहू शकलो नाही अशी माहिती महानगर प्रमुख दिलीप कंदकुर्ते यांनी दिली. तर मला या पक्ष सोहळ्याचा निरोप नव्हता असं नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी सांगितले.दरम्यान भाजप जिल्हाध्यक्षकांच्या अनुपस्थित हा पक्ष सोहळा पार पडल्याने चर्चेला उधाण आले आहे.

अशोक चव्हाण हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये अस्वस्था पसरली होती. अनेकजण चव्हाण यांच्या सोबत जातील, असा विश्वास देखील व्यक्त केला जात होता. मात्र काही जण तर आम्ही काँग्रेस सोबत राहणार असा दावा केला होता. राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर अशोक चव्हाण हे शुक्रवारी पहिल्यांदाच नांदेडला आले होते. त्यानंतर त्यांनी आज समर्थकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसचे ५५ माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान अशोक चव्हाण यांनी स्वतः ट्विट करत माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाची माहिती देखील दिली.सध्या प्रशासक राज असलेल्या महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता होती. पालिकेतील ८६ पैकी काँग्रेसचे ७७ नगरसेवक होते. दरम्यान माजी नगरसेकांनी भाजप प्रवेश केले असले तरी मुस्लिम समाजातील २३ नगरसेवक मात्र काँग्रेस सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान चव्हाण यांच्या पक्षातंरानंतर काँग्रेस पक्षातील तीन टक्के कार्यकर्ते हे अशोक चव्हाण सोबत जातील आणि इतर कार्यकर्ते काँग्रेसमध्ये राहणार, असा विश्वास पक्ष निरीक्षकांकडून व्यक्त केला जात होता. मात्र आज त्यापेक्षा अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.