ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रेच्या तयारीचा प्रशासनाकडून आढावा
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक
लातूर/प्रतिनिधी:
लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास दि.८ मार्च रोजी प्रारंभ होणार आहे.यासाठी विश्वस्त मंडळाकडून तयारी करण्यात येत असून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या तयारीचा आढावा घेण्यात आला.अप्पर जिल्हाधिकारी नितीन वाघमारे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे, तहसीलदार सौदागर तांदळे,देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर,ज्येष्ठ विश्वस्त विक्रमतात्या गोजमगुंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यात्रा महोत्सव सुरळित पार पाडण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी नितीन वाघमारे यांच्यासह अधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या.दि.२९ फेब्रुवारीपासून पशुप्रदर्शन घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणून महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा कराव्यात, त्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी असे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले. देवस्थानच्या प्रशासकांनी वेळोवेळी सूचना कराव्यात.मनपाच्या अभियंत्याकडून देवस्थान व यात्रा परिसराचा नकाशा तयार करून आखणी करावी.यात्रेमध्ये स्टॉल उभे करताना अग्निशमन दलाचे वाहन जाऊ शकेल अशा पद्धतीने मोठे रस्ते ठेवावेत.महावितरणने सुरळीत वीज पुरवठ्यासाठी अभियंता आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. वेळोवेळी तहसीलदार यांच्याशी संपर्क ठेवावा.

पार्किंगसाठी एजन्सीची नेमणूक करावी. भाविकांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी मनपाने व्यवस्था करावी.१०८ क्रमांकाची ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी. दर्शन रांगेसाठी सावलीची व्यवस्था करावी.भक्तांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून ठेवावे.देवस्थान व यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.जागतिक महिला दिनानिमित्त दि.८ मार्च रोजी विविध कार्यक्रम घ्यावेत.यात्रेच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त अधिकारी देवस्थान परिसरात उपलब्ध असावा,अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. या बैठकीस विश्वस्त अशोक भोसले,श्रीनिवास लाहोटी,नरेश पंड्या,सुरेश गोजमगुंडे,विशाल झांबरे, ओम गोपे, व्यंकटेश हलींगे, बचेसाहेब देशमुख, दत्ता सुरवसे यांच्यासह विश्वस्त तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.