• Wed. Apr 30th, 2025

फक्त बारा जागा कशा? भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, शिंदेंचे खासदार गजानन कीर्तिकर नाराज

Byjantaadmin

Feb 22, 2024

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून अधूनमधून खटके उडताना दिसतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर संभाव्य जागावाटपावरुन नाराज असल्याचं वृत्त आहे.

महायुतीमधील जागावाटपात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्यास लोकसभेच्या १२ जागा मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यावर शिंदे गटाचे खासदार गजनान कीर्तिकर यांनी तातडीने प्रतिक्रिया देताना जागावाटपाचे हे सूत्र मान्य नसल्याचे सांगितले. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, असेही ते म्हणाले.महायुतीमधील संभाव्य जागावाटपाची आकडेवारी बुधवारी बाहेर आली. त्यानुसार भाजपला ३२, शिवसेनेला १२ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळणार असल्याचे समोर आले. याबाबत कीर्तिकर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नाराजी व्यक्त केली.आम्ही काही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, असे ते म्हणाले. हे जागावाटप कुठून आले मला माहीत नाही. आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्हाला हे सूत्र मान्य नाही. २०१९ मध्ये आम्ही २२ जागा लढलो होतो, त्यात आम्ही ४ ठिकाणी हरलो. मग १२ जागा कशा घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेले गजानन कीर्तिकर स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीवरील नाराजी कीर्तिकर यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली होती. अगदी दसरा मेळाव्यातही थेट माध्यमांसमोर कीर्तीकरांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. शिंदे गटात गेल्यानंतरही रामदास कदम यांच्यासोबत कीर्तिकरांचे जाहीर वाद झाले होते.

कोण आहेत गजानन कीर्तिकर?

गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे दिग्गज नेते असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. १९९० ते २००९ या काळात ते चार वेळा आमदार राहिले आहेत. कीर्तिकर हे मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री राहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed