• Wed. Apr 30th, 2025

थोरात भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा; विखे म्हणतात, नको! आमच्याकडे हाऊसफुल्ल झालंय

Byjantaadmin

Feb 22, 2024

शिर्डी : तुम्ही रात्रीच्या अंधारात अनेक वेळा पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. तुम्ही कोणत्या पक्षनिष्ठेच्या गप्पा मारताय? आपल्याच दिव्याखाली अंधार असेल तर दुसऱ्यांच्या पंचायती करणे बंद करा. तुम्ही रात्री कोणाचे पाय धरता हे मला खाजगीत विचारा, मी तुम्हाला सांगेन, अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला. थोरातांच्याच बालेकिल्ल्यात तुफान फटकेबाजी करत विखेंनी पुन्हा डिवचलं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरू असतात. त्यामुळे विखे पाटलांच्या संगमनेर दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरात विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. गेल्या वर्षभरापासून मागणी असलेल्या संगमनेर शहरातील माळुंगी नदीवरील पुलाचे भूमिपूजन विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी शिंदे गटाचे खा. सदाशिव लोखंडेंसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?

विखे पुढे म्हणाले की, संगमनेरसह अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला. इतक्या वर्षात या संगमनेर शहरात महाराजांचं साध स्मारक देखील उभं राहू शकलं नाही.आमच्यावर पक्ष बदलण्याची टीका काँग्रेसचे मित्र करतात पण आम्ही जे करतो ते डंके की चोट पर जाहीरपणे करतो. १९८५ साली बाळासाहेब विखे काँग्रेसकडून खासदारकीला उभे असताना तुम्ही तुमच्या मेहुण्याच्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे काम केलं. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शकुंतला थोरात यांच्या विरोधात उमेदवारी करत घोडा चिन्ह घेतलं व तुम्ही काँग्रेसलाच घोडा लावला. तुमचा मेव्हणा (डॉ. सुधीर तांबे ) नाशिक पदवीधर मध्ये उभा राहिला त्यावेळी काँग्रेसच्या विरोधात त्यांना अपक्ष म्हणून निवडून आणलं. हे सगळ चालतं अंधारात. यावेळी भाचे ( सत्यजित तांबे ) निवडणुकीत उभे राहिले आम्ही निवडून आणलं त्यांना. तुमचा महाविकास आघाडीचा उमेदवार होता आणि तुम्ही हात बांधून बसला होतात. हात बांधले होते तोंड नव्हतं बांधला ना? त्यावेळी मी काँग्रेसचा निष्ठावान सैनिक आहे, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत द्या हे का नाही सांगितलं? असा प्रश्न विखेंनी विचारला.कोणत्या पक्षनिष्ठेच्या तुम्ही गप्पा मारता. या तालुक्याला आज 60 टँकर चालू आहेत. तुम्ही पाणी सुद्धा देऊ शकले नाही. या तालुक्यात वाळू माफिया, मुरूम माफिया, टँकर माफिया सगळ्या माफियांचं साम्राज्य तयार झालं आहे. या माफियांचं साम्राज्य उद्ध्वस्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा देखील विखे पाटलांनी दिलाय.

आमच्याकडे हाऊसफुल्ल झालंय

गेले काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले, आता त्यांच्या फ्लेक्सवरून सोनिया व राहुल गांधी देखील गायब झाल्याचे दिसून येत आहे. कोणत्या दिशेला ते चालले हे समजत नाही. आमच्याकडे तर आता हाऊसफुल झालंय. खासदार लोखंडे यांच्या पक्षात जात असतील तर त्यांनाच माहीत अशा शब्दात महसूल मंत्री विखे पाटीलांनी थोरात यांना टोला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed