• Tue. Apr 29th, 2025

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी चालवलेली मर्सिडीज कोणत्या बिल्डरची?

Byjantaadmin

Dec 5, 2022

मुंबई: राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे येत्या ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यानंतर नागपूर ते शिर्डी असा ५२९ किलोमीटरचा टप्पा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होईल. या लोकार्पण सोहळ्यापूर्वी रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर टेस्ट राईड घेतली. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ड्रायव्हिंग करत नागपूर ते शिर्डी हे अंतर पार केले. समृद्धी हा द्रुतगती महामार्ग असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी या रस्त्यावरुन अक्षरश: १५० च्या स्पीडने गाडी चालवली. यावेळी देवेंद्र फडणवीस चालवत असलेली मर्सिडीज बेंझ Mercedes-Benz G350d ही कार सर्वांच्याच नजरेत भरली होती

ही मर्सिडीज कार एका बांधकाम व्यावसायिकाची असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस पक्षाकडून यासंदर्भात एक ट्विट करण्यात आले असून त्या माध्यमातून राज्य सरकारला काही सवाल विचारण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस चालवत असलेली मर्सिडीज बेंझ ही गाडी कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मालकीची आहे. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या संघटनेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर यांची नियुक्ती केली होती. अजय आशर हे बांधकाम व्यावसायिक असून ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अशातच आता काँग्रेसने देवेंद्र फडणवीस चालवत असलेली मर्सिडीज कार बिल्डरच्या मालकीची असल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. यावरुन काँग्रेसने राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बिल्डरची गाडी चालवतायत मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का?, असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

वेगवान प्रवासासाठी उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावरुन देवेंद्र फडणवीस यांनी सुस्साट म्हणावी अशीच गाडी चालवली. अनेक दिवसांनी गाडी चालवत असूनही देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास १५० किमीच्या वेगाने गाडी पिटाळली. त्यामुळे त्यांनी नागपूर ते शिर्डी हे ५२९ किलोमीटरचे अंतर अवघ्या पाच तासांमध्ये पार केले. मात्र, यावेळी फडणवीस चालवत असलेली Mercedes-Benz G350d मर्सिडीज कार अनेकांच्या नजरेत भरली होती. या कारची किंमत जवळपास २ कोटी रुपये इतकी आहे. मर्सिडीज जी-क्लास ऑफ-रोडिंगसाठी ओळखली जाते. ही कार फक्त ७.४ सेकंदात 0 ते १०० किमी/ताशी वेग पकडू शकते. या अलिशान गाडीत थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, नऊ एअरबॅग्ज, पॉवर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स अशा सुविधाही आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed