मुंबई : शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगालाच धारेवर धरलं. निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढत असतं का? शिक्षकांऐवजी आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई करायला हवी, असं राज ठाकरे म्हणाले. शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आली. यावेळी शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी कुठेही निवडणूक कार्यक्रमाला रुजू होऊ नये, मुलांकडे लक्ष द्यावं, कोण काय कारवाई करतं, त्याकडे मी पाहतो, असं राज म्हणाले. त्याच वेळी महायुतीबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना राज ठाकरेंनी झापलं. आजचा विषय वेगळा आहे, ज्यावेळी निवडणुकांवर बोलायचं असेल, तेव्हा निवडणुकांवर बोलेन, आलात म्हणून विचारायचं नाही, अशी तंबी त्यांनी दिली
राज ठाकरे काय म्हणाले?
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी काम करण्याचे आदेेश देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४ हजार १३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यात आलं आहे. एवढं काय काम असतं? निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतं?
दर वर्षी निवडणूक आल्यावर घाई गडबडीत का कामं करुन घेतली जातात? हजर न होणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. उलट निवडणूक आयोगावर पाच वर्ष काही काम न केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असं राज ठाकरे म्हणाले.

निवडणुका येणार हे माहित नव्हतं का, अचानक निवडणुका आल्या का? तुमची यंत्रणा तयार नको का, दरवेळी काहीतरी काढून वाद निर्माण करायचा, या सगळ्यात शाळेतील लहान मुलांचा काय दोष? शिक्षक काय निवडणुकांच्या कामासाठी आले आहेत का? शिक्षकांचं काम हे ज्ञानदानाचं आहे. शिक्षकांना विनंती आहे, त्यांनी निवडणुकीच्या कामासाठी कुठेही रुजू होऊ नका, मुलांकडे लक्ष द्या, कोण काय कारवाई करतं, त्याकडे मी पाहतो. शिक्षकांना कामाला लावण्यापेक्षा
नवीन लोक तयार करावे, त्यांना प्रशिक्षण द्यावं, असंही राज ठाकरेंनी सुचवलं.
महायुतीत समावेशाच्या चर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भाजप नेते आशिष शेलार यांची सकाळीच उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघा दिग्गज नेत्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मनसेही भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. मात्र महायुतीबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना राज ठाकरेंनी झापलं. आजचा विषय वेगळा आहे, ज्यावेळी निवडणुकांवर बोलायचं असेल, तेव्हा निवडणुकांवर बोलेन, आलात म्हणून विचारायचं नाही, अशी तंबी त्यांनी दिली.