छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच आता भाजप नेते छत्रपती शिवरायांविषयक अवमानकारक वक्तव्ये करून त्या आगीत तेल आेतत आहेत. मुंबईतील भाजप ओमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे विधान केले. लाड यांच्यापाठोपाठ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात त्यांनी छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्याचे समोर आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या औरंगाबाद येथील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर छत्रपतींचा अवमान करणाऱ्या वक्तव्यांची मालिकाच भाजप नेत्यांनी लावली आहे. कौशल्य विकास, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड आणि आता खुद्द केंद्रीय मंत्री दानवेही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. लाड यांच्या विधानावर वाद पेटला असून राष्ट्रवादी, शिवसेनेसह भाजपचे सत्ताधारी मित्र शिंदे गट आणि खुद्द भाजपतील नेत्यांनीही टीकेची झोड उठवली आहे. स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना शनिवारी प्रसाद लाड यांनी हे चुकीचे वक्तव्य केले. विशेष म्हणजे त्यांच्या शेजारी विधान परिषदेतील भाजप नेते प्रवीण दरेकर बसले होते. लाड यांची चूक लक्षात येताच समोर बसलेल्या काही व्यक्तींनी कुजबूज करत शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला असे सांगून पाहिले, परंतु त्यानंतरही लाड यांनी आपले बोलणे सुरूच ठेवले.
संभाजीराजे छत्रपती संतापले : लाड यांचा समाचार घेताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही संताप व्यक्त केला. लाड यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहे. त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. लाड यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. ते जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्रातून काढून टाकले पाहिजे, असे संभाजीराजे म्हणाले.
आमदारांना इतिहासाचे धडे द्या : राष्ट्रवादी : राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसाद लाड यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून भाजपवर सडकून टीका केली. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात, परंतु महाराजांचा इतिहासच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीने भाजपची खरडपट्टी काढली.
औरंगाबादेत मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन : राज्यापाल भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे रविवारी सहकारमंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर शिवप्रेमींनी आंदोलन केले.
खा. उदयनराजे भाेसले समर्थकांचे आंदाेलन राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या वक्तव्याचे संतप्त पडसाद सातारा येथे उमटले. सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले समर्थक रोहित किर्दत यांच्या नेतृत्वाखाली ५०-५५ शिवप्रेमींनी पोवई नाका येथे रावसाहेब दानवे आणि राज्यपालांंचा पुतळा जाळला.
मुख्यमंत्री शिंदे वैतागले, अक्षरश: हात जोडले छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्ये करून राज्यपालांसोबतच भाजप नेते राज्य सरकारलाच अडचणीत आणत आहेत. रविवारी लाड आणि रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यांबद्दल प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारताच त्यांनी काहीही भाष्य करण्याचे टाळून अक्षरश: हात जोडले.