मुंबई : सुमारे चार दशकांहून अधिक काळ काँग्रेस पक्षात राहून, विविध पदं भूषवून, अगदी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याचा बहुमान देणाऱ्या काँग्रेसचा हात सोडून काळानुरूप नवा पर्याय पाहिला पाहिजे, असे सांगत ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. माझ्या नव्या आयुष्याला मी सुरूवात करतोय, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. त्यांच्या प्रवेशाने राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटतायेत. जो नेता तुमच्यासाठी कालपर्यंत भ्रष्टाचारी होता, तो नेता आता भाजपमध्ये कसा काय चालतो, असे सवाल समाज माध्यमांतून विचारले जात होते. अगदी तोच सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला विचारला आहे.

नाना पटोले काय म्हणाले?
एकतर भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख समजतात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत, असा आरोप भाजपने वारंवार केला. त्यानंतर भाजपने अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमिरा लावला. अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात दाखल झाले, हा कृतीचा परिणाम आहे.
आता प्रश्न असा आहे की, कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमकं असं काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले? निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते, अशआ शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर बोचरा वार केला आहे.