लातूर, (विमाका) : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा संपूर्ण लाभ मिळण्यासाठी योजनेची राज्यात 6 डिसेंबर, 2023 ते 15 जानेवारी, 2024 या कालावधीत गावपातळीवर राबविलेल्या मोहिमेत 1 लाख 4 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, 3 लाख 1 हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. तथापि, 1 लाख 94 हजार शेतकऱ्यांनी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई-केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे मुख्यत: सामाईक सुविधा केंद्रांमार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी, 2024 या 10 दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची क्षेत्रियस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दिले आहेत.

या मोहिमे दरम्यान केवळ ई-केवायसी प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी नजीकचे ग्रामस्तरीय नोडल अधिकारी, सामाईक सुविधा केंद्र, शेतकऱ्यांच्या स्वत:च्या मोबाईलवरील ओटीपी पी.एम. किसान फेस ऑथेंटिफिकेशन ॲप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेच्या मार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करावे.
पी.एम. किसान योजने अंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. बँक खाती आधार संलग्न करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे.
केंद्र शासन पी. एम. किसान योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारी, 2024 च्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करणार आहे. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात येईल. या दोन्ही योजनांच्या लाभासाठी 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता करावी. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पूणे कृषी आयुक्तालयाचे, कृषी संचालक(विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.