राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एका गुंडासोबतचा फोटो ट्वीट करून संजय राऊत यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. काही दिवसांपासून राऊत मुख्यमंत्री शिंदे यांचे गुंडांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्याला अजून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून कुठलेली प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही, हे विशेष.

एकाच आठवड्यात राज्यात दोन गोळीबारांच्या घटना झाल्या आहेत. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड ) यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची दहिसरमध्ये फेसबूक लाईव्ह करून हत्या करण्यात आली होती.
हे सुरू असतानाच ठाकरे गटाचे संजय राऊतमुख्यमंत्र्यांचे गुंडांशी संबंध असल्याचा आरोप करून त्यांचे गुंडांसोबतचे फोटो ट्वीट करत आहेत. आज तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका गुंडाने सेल्फी घेतानाचा फोटा व्हायरल करून खळबळ उडवली आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नाशिकमधल्या गुंडाची सेल्फी
नाशिक शहर परिसरात हत्या, अपहरण, दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला वेंकट मोरे हा गुंड मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेतानाचा फोटो संजय राऊत यांनी व्हायरल केल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्याचवेळी राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवरही (Devendra Fadnavis) टीकेचे बाण सोडले आहेत.
“गृहमंत्री देवेंद्रजी यालाच म्हणतात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! नाशिक शहर परिसरात हत्या, अपहरण, दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. तुमचे मुख्यमंत्री देखील खुषीत आहेत! हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच! हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा!”, असं ट्विट करत त्यांनी एसआयटीची चौकशीची मागणी केली आहे.