लातूर जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ
खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर, दि. 9 (जिमाका): शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धा होणे आवश्यक आहे. अशा स्पर्धांमुळे अधिकारी व कर्मचारी एकत्रित आल्याने सांघिक भावना वाढीस लागते. शासनाने सोपविलेली जबाबदारी पार पाडणे आणि कार्यालयीन कामकाज सांघिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये आयोजित जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, दत्तात्रय गिरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, कार्यकारी अभियंता अभय देशपांडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी व जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दैनंदिन कामकाज करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी एखादा आवडीचा खेळ खेळायला हवा. निरोगी आयुष्य जगण्याची गुरूकिल्ली असून खेळामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.
स्पर्धेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खेळाचा आनंद घ्यावा. कर्मचाऱ्यांनी मनावरचा ताण कमी करुन खेळाचा आनंद घ्यावा. शारिरीक क्षमतांचा विकास करुन आणि आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आनंदाने खेळात रममाण व्हावे, असा सल्ला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिला.
प्रस्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी केले. दहा तालुक्यातील अधिकारी –कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी विविध आकर्षक देखावे करत संचलन करण्यात आले. तसेच क्रीडा मशाल पेटवून स्पर्धेला प्रारंभ झाला. आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी यांनी मानले. सूत्रसंचालन संवादतज्ञ उध्दव फड यांनी केले.