• Tue. Apr 29th, 2025

राज्यात हलका गारवा; तीन दिवसांत पुन्हा तापमानवाढीची शक्यता

Byjantaadmin

Dec 2, 2022

कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे राज्यात सध्या पुन्हा हलका गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पुढील तीन दिवसांत पुन्हा काही प्रमाणात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात थंडीचा कडाका वाढला होता. सर्वत्र किमान तापमान सारसरीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर घटले होते. मात्र, बंगालच्या उपसागरात आणि पाठोपाठ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने केरळ, तमिळनाडूसह दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पावसाळी स्थिती निर्माण झाली. राज्यात प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने तापमान सरासरीपुढे जाऊन थंडी गायब झाली होती. रात्री उकाडा जाणवत होता. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाची स्थिती असल्याने किमान तापमानात काही प्रमाणात घट होऊन हलका गारवा निर्माण झाला आहे.

गुरुवारी (१ डिसेंबर) औरंगाबाद येथे राज्यातील नीचांकी १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात इतर भागांतही तापमान सरासरीखाली आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आदी भागांत हलका गारवा आहे. मुंबईसह कोकण विभागात तापमान सरासरीच्या जवळ आहे. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली असल्याने रात्री या भागातही हलका गारवा आहे. दोन ते तीन दिवसांत मात्र पुुन्हा प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात २ ते ३ अंशांनी तापमानवाढ होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या बहुतांश भागात रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली किंवा जवळ आल्याने हलका गारवा आहे. मात्र, निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे बहुतांश भागात दिवसा उन्हाचा चटकाही जाणवत आहे. मुंबईतील सांताक्रुझ केंद्रावर बुधवारी (३० नोव्हेंबर) ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. या दिवशी हे तापमान देशातील उच्चांकी तापमान ठरले. गुरुवारी मात्र त्यात सुमारे २ अंशांनी घट झाली. गुरुवारी रत्नागिरी येथे ३५.० अंश सेल्सिअस राज्यातील उच्चांकी कमाल तापमान नोंदविले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed