पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा आम्हीच लढवणार अशी घोषणा भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी नुकतीच केली होती. त्यादृष्टीने भारतीय जनता पक्ष गेली अनेक महिने ग्राऊंडवर कामही करत होता. परंतु शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि अजित पवार हे भाजप-शिंदे सेनेला जाऊन मिळाले. नव्याने महायुतीत सामील झालेल्या अजितदादांमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. याच पार्श्वभूमीवर बारामतीची जागा कोण लढवणार? भाजप माघार घेणार का? अजित पवार उमेदवार देणार का? अशा चर्चा गेली सहा महिने सुरू होत्या. अखेर या प्रश्नांची उत्तरे आता मिळाली आहे आणि ती उत्तरे दिली आहेत- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे!

बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार हेच उमेदवार देणार असून त्यांचा उमेदवार आम्हाला मान्य असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे बारामतीची जागा अजित पवार यांच्याकडे गेल्याचं आता अधिकृतरित्या भाजप अध्यक्षांनी सांगितल्याने पवार घराण्यातील संघर्ष आता अटळ मानला जातोय. विशेष म्हणजे बदलत्या राजकीय समीकरणामुळे गेली अनेक वर्षे अजित पवार यांना कडवा विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आता अजित पवार यांचेच काम लोकसभा-विधानसभेला करावे लागणार आहे.
भाजप कार्यकर्त्यांना अजित पवारांचं काम करावं लागणार
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले. तत्पूर्वी गेली अनेक वर्षे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे पवार यांना विरोध करत आले आहेत. किंबहुना पवार विरोधाच्या मेरिटवरच यातील अनेकांना पदे मिळाली, ही वस्तुस्थिती आहे. आता खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच अजित पवार हेच उमेदवार देणार असून तो आम्हाला मान्य असेल असे स्पष्ट केले. त्यामुळे बारामतीची जागा भाजप लढवणार… बारामतीत कमळ फुलणार या घोषणा तूर्तास भाजप कार्यकर्त्यांना नाईलाजाने का होईना पण बंद कराव्या लागतील.गत आठवड्यातच पक्षाचे पुणे जिल्हा दक्षिण प्रमुख वासुदेव काळे यांनी बारामतीचा उमेदवार भाजपचाच असेल आणि तो कमळाच्या चिन्हावरच लढेल असे स्पष्ट केले होते. त्यालाही आता पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नुकतेच बारामतीत एका कार्यक्रमात राष्ट्रवादीकडे २०१९ साली असलेल्या जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे बारामतीसह चार जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.