केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाला दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीच्या चिन्ह व नावासंदर्भात अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटांच्या कुठल्या गटाकडे चिन्ह व पक्षाचे नाव जाणार यावर निर्णय पार पडल्यानंतर, राज्यात अजित पवार गटाकडून फटाके फोडत व पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला आहे. दुसरीकडेsharad pawar यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर आज सकाळी बॅनर लावून अजित पवारांना टोला लगावला आहे.

‘जो अपना नहीं हुआ वो जनता का क्या होगा,’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील नाव व चिन्हाचा निर्णय राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या घटकांना मिळाला आहे. अजित पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आनंदोत्सव साजरा करीत आहेत.
दोन्ही गटांनी आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत, म्हणून निवडणूक आयोगात धाव घेतली होती. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्यावर्षी जुलै महिन्यात दोन गट पडले होते.
आगामी लोकसभा निवडणुकीवर या निकालाचे राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार गट अधिकृत पक्ष असल्याने त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. शरद पवार गटाला नव्याने पक्ष बांधणी करावी लागणार आहे. विधानसभा आणि लोकसभेतील बहुमत हे अजित पवार गटाच्या बाजूने होतं. तेच निर्णायक ठरल्याचं निवडणूक आयोगाच्या सुनावणीवरुन दिसते.
पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल देताना पक्ष संघटनेतील पदाधिकारी आणि सदस्यसंख्येनुसार निर्णय देण्याऐवजी निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या प्रकरणाप्रमाणेच लोकप्रतिनिधींचे विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊनच अजित पवारांच्या बाजूने हा निकाल दिला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटच खरा राष्ट्रवादी पक्ष असा निकाल निवडणूक आयोगाने दिला.