आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरकेंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही कामात लहान मुलांचा वापर न करण्याचे निर्देश आयोगाने सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत. राजकीय पक्षांनी पोस्टर्स, पॅम्प्लेट वाटप, प्रचार रॅली आणि निवडणूक सभांसह कोणत्याही स्वरूपातील निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये असं आयोगाने म्हटलं आहे. तसं आढळल्यास राजकीय पक्षांसोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला आहे.
निवडणुकीच्या कामात मुलांचा वापर नको म्हणजे नकोच
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. निवडणुकीच्या कोणत्याही कामात लहान मुलांचा वापर करण्याबाबत कडक निर्देश जारी करण्यात आले आहेत. पोस्टर आणि पॅम्प्लेटमध्ये प्रचारासाठी कोणत्याही स्वरूपात लहान मुलांचा वापर करण्यास मनाई केली आहे.
राजकीय पक्षांना पाठवलेल्या ॲडव्हायझरीमध्ये, निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेदरम्यान पक्ष आणि उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारे लहान मुलांचा वापर करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
आई वडिलांसोबत मूल असेल तर उल्लंघन नाही
आयोगाने त्याच्या नियमावलीत म्हटलं आहे की, ही नियमावली कविता, गाणे, उच्चारलेले शब्द, राजकीय पक्षाचे प्रदर्शन किंवा उमेदवाराचे चिन्ह यासह कोणत्याही स्वरूपात राजकीय प्रचारासाठी मुलांच्या वापरावर लागू होते. कोणत्याही राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रचाराच्या कार्यात सहभागी नसलेला नेता आणि एखादे मूल त्याच्या आई-वडिलांसह किंवा पालकांसह केवळ त्यांच्या जवळच असेल, तर अशा परिस्थितीत ते मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन मानले जाणार नाही.