मुंबई: ‘नशा’ या सिनेमातून २०१३ साली बॉलिवूड पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री पूनम पांडेचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. २ फेब्रुवारी रोजी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट करण्यात आली आहे. या बातमीनंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये की पूनमच्या बाबतीत असा काही प्रकार घडला. अभिनेत्रीचे Cervical कॅन्सरमुळे निधन झाल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. पूनम अवघ्या ३२ वर्षांची होती. इन्स्टाग्रामवरील या पोस्टनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ईटाइम्स टीव्हीने पूनमच्या टीमशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताची पुष्टी केली.पूनमच्या अकाउंटवरुन जी पोस्ट करण्यात आली आहे की, ‘आजची सकाळ आम्हा सर्वांसाठीच खूप कठीण होती. हे सांगताना खूप दु:ख होते आहे की आपण आपल्या लाडक्या पूनमला सर्व्हायकल कॅन्सरमुळे गमावले आहे. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला तिच्याकडून प्रेम आणि दया मिळाली. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही प्रायव्हसी बाळगण्याची विनंती करतो.’

चाहत्यांना बसत नाहीये विश्वास
दरम्यान अभिनेत्रीच्या अकाउंटवरुन करण्यात आलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत हे वृत्त खोटे असल्याचे शक्यता वर्तवली आहे. शिवाय ही पोस्ट म्हणजे एक प्रँक आहे किंवा पूनम पांडे नव्हे तर दुसऱ्याच कोणत्यातरी पूनमचे निधन झाल्याचेही काही युजर्सनी म्हटले आहे. कारण पांडेच्या अकाउंटवरुन जी पोस्ट करण्यात आली आहे त्यात केवळ ‘पूनम’ असा उल्लेख आहे, ‘पूनम पांडे’ असा नाही. काहींनी तिचे अकाउंट हॅक झाल्याचाही संशय व्यक्त केला. दरम्यान अभिनेत्रीने २९ जानेवारी रोजी शेवटची पोस्ट केली होती, त्यामुळे अवघ्या तीन दिवसात असं नेमकं काय घडलं? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. तिने गोव्यातून हा व्हिडिओ शेअर केलेला.

दरम्यान पूनमने २०२२ मध्ये आलेला कंगना रणौतचा वादग्रस्त शो ‘लॉक अप’ तुफान गाजवला होता. मुनव्वर फारुकीने जिंकेलेल्या शोच्या पहिल्याच सीझनमध्ये ती सहभागी झाली होती.