• Mon. Apr 28th, 2025

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमध्ये स्थान मिळविलेल्या आमदार यशोमती ठाकूर यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी ताकद वाढली आहे. नागपूरनंतर विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती समजल्या जाणाऱ्या अमरावतीच्या बाजार समितीवर कब्जा केल्यानंतर आता यशोमती ठाकूर यांनी तालुका खरेदी-विक्री संघही ताब्यात घेतला आहे.

या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी एकहाती सत्ता मिळविली आहे. यापूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही ठाकूर यांच्या सहकार पॅनलने वर्चस्व राखले होते. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तत्पूर्वी होणाऱ्या निवडणुकांकडे ‘लिटमस टेस्ट’ म्हणून पाहिले जाते. अशाच एका निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.

AMRAVATI तालुका खरेदी-विक्री संघाची ELECTION नुकतीच पार पडली. या निवडणुकीत आमदार यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलने एकहाती सत्ता मिळवली आहे. 17 सदस्य संख्या असलेल्या खरेदी विक्री संघाच्या 17 पैकी 16 जागांवर सहकार पॅनलचे प्रतिनिधी अविरोध निवडून आले आहेत. यापूर्वीही जिल्ह्यातील अनेक तालुका विक्री संघाच्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलचा विजय झाला आहे.

अमरावतीच्या सहकार क्षेत्रात यशोमती ठाकूर यांची ताकद आता वाढत आहे. यापूर्वी अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलने सर्व जागांवर कब्जा करीत भाजप, शिंदे सेना आणि आमदार रवी राणा यांच्या शेतकरी पॅनलला चारही मुंड्या चीत केले होते. विजयानंतर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने एकच जल्लोष केला. स्वत: यशोमती ठाकूर यांनी रस्त्यावर येत आनंद साजरा केला होता.यापूर्वीही अमरावती जिल्हा बँक निवडणूक यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलने जिंकली होती. ठाकूर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने 10 जागा जिंकत परिवर्तन पॅनलला धूळ चारली होती. जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ यांच्या निवडणुकांना आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकांकडे राजकीय क्षेत्रातील मातब्बरांचे विशेष लक्ष राहते. यामध्ये आपले वर्चस्व स्थापन करत सहकार क्षेत्राची कमान हातामध्ये राहण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष तयार असतात.सहकार क्षेत्र ताब्यात ठेवण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळते. ग्रामीण भाग सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे यातील मतदारांवर सर्वांचं विशेष लक्ष असतं. येणाऱ्या काळात याचा फायदा निश्चितच ठाकूर यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed