भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाची आता राज्यसभेसाठी चर्चा सुरू झाल्याने कार्यकर्त्यांचा हुरुप वाढला आहे. मागील साडेचार वर्षांपासून भाजपकडून कायम टाळले जाणे, आगामी काळात विधानसभा निवडणुकीत महायुतीत परळीच्या जागेचा पेच, यामुळे आता पंकजा मुंडेंना राज्यसभा मिळाली तर सगळेच कळीचे मुद्दे आपोआप निकाली लागतील, असा त्यांच्या समर्थकांचा आशावाद आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर विधान परिषद, राज्यसभेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र, त्यांच्याऐवजी भाजपने इतरांना संधी दिली. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी टाळलेल्या विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे हे दोन नेते भाजपच्या वेगळ्या प्रवाहात आले. तावडे केंद्राच्या राजकारणात सक्रिय झाले, तर बानवकुळे थेट प्रदेशाध्यक्ष झाले. तत्पूर्वी पंकजा मुंडे यांना भाजपचे राष्ट्रीय सचिवपद आणि मध्य प्रदेशचे सहप्रभारीपद देण्यात आले. मात्र, त्यांना म्हणावा तेवढा वाव दिला गेला नाही.

पंकजा मुंडेदेखील या साडेचार वर्षांच्या काळात म्हणाव्या तेवढ्या सक्रिय दिसल्या नाहीत. सक्रिय नसल्याबाबतची कारणे आणि त्यांना टाळले जात असल्याची खदखद त्यांनी अनेक वेळा थेटपणे व्यक्त केली. त्यांनी अनेकदा राज्यातल्या भाजप नेत्यांना आपला नेता मानण्यास नकार देत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाच आपले नेते असल्याचे निक्षून सांगितले होते.
डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार्यक्रमात आपल्या राजकीय भवितव्याबद्दल आपण थेट गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण, त्यांची अद्याप भेट झालेली नाही. तर, गेल्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यात आपण राज्यभर फिरणार असल्याची घोषणा त्यांनी केली खरी, पण त्याचीही अंमलबजावणी झाली नाही.
दरम्यान, आता राज्यात महायुतीच्या प्रयोगानंतर नवे राजकीय समीकरण तयार झाल्याने परळी विधानसभा निवडणुकीचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना उमेदवारी कोठून असा प्रश्न आहे. LOKSABHA पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली, तर डॉ. प्रीतम मुंडेंचे काय? त्या लोकसभेला लढल्या आणि विधानसभेला महायुतीत परळीची जागा राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना तर पंकजा मुंडेंचे काय? असा पेच होता.मात्र, आता देशातील राज्यसभेच्या 56 जागांची प्रक्रिया सुरू झाली असून यात पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आल्याने समर्थकांना हायसे वाटत आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे लोकसभा व विधानसभेचा पेचही निकाली निघणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे सक्रिय झाल्या आहेत. राज्यात नवे समीकरण झाले तसे त्यांचे व बंधू कृषिमंत्री DHANJAY MUNDE यांच्यातील कौटुंबिक संबंधदेखील पूर्वीप्रमाणे झाले आहेत. आता राज्यसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंना भेटली तर सर्वच प्रश्न निकाली निघतील, अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे.