• Mon. Apr 28th, 2025

ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण जाहीर

Byjantaadmin

Jan 30, 2024

मुंबई : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचं अभिनंदनही केलं आहे.

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर ते खलनायकापर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं, असं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटलं आहे.

मराठमोळे अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिका तसंच नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. विनोदी भूमिका साकारणं हा त्यांच्या हातखंडाच. त्यामुळेच ते बहुतांश मालिका, चित्रपट आणि नाटकात विनोदी पात्र साकारताना दिसले.

चित्रपटसृष्टीचा अशोक सम्राट’

अशोक सराफ यांना खरी ओळख मराठी चित्रपटातून मिळाली. त्यांचं काम पाहून त्यांना सिनेविश्वातील लोक ‘अशोक सम्राट’ म्हणू लागले.

अभिनय करण्यापूर्वी करायचे बँकेची नोकरी

इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अशोक सराफ बँकेत काम करत होते. त्यांना आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं, पण त्यांनी वडिलांचा शब्द पाळत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरू केली. त्यासोबतच आपला अभिनयाचा छंद जोपासत ते नाटकांत काम करू लागले. पुढे त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांना अक्षरश: वेड लावलं. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या कलाकाराने मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं.

२५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये

अशोक सराफ यांनी १९६९ पासून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपट केले, त्यापैकी १०० व्यावसायिक हिट ठरले. त्याने कॉमेडी सिनेमांमधून तुफान लोकप्रियता मिळवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed