• Mon. Apr 28th, 2025

गुगल मॅपने चुकवली वाट; व्यक्ती अशा ठिकाणी पोहचला की पोलिसांना बोलवावं लागलं

Byjantaadmin

Jan 30, 2024

आजकाल सगळं जग जवळ आलं आहे. आपण बहुतेक सर्व गोष्टींसाठी तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याचं पाहायला मिळतं. अगदी सर्चिंग असो, पेमेंट असो किंवा मग शॉपिंग सर्व काही तंत्रज्ञानामुळे सोपं झालं आहे. आपल्याला कधी, कुठे नवीन ठिकाणी जायचं असेल तरही आपण गुगल मॅपची मदत घेतो. पण, ‘गुगल मॅप’ने सुद्धा धोका दिला तर… अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. व्यक्तीला जाययं होतं एका ठिकाणी आणि गुगल मॅपमुळे पोहोचला भलतीकडेच. बरं नुसता पोहोचला नाही, तर चांगलाच अडकला. नक्की काय घडलं जाणून घ्या.

गुगल मॅपने चुकवली वाट

निलगिरीतील उटीजवळील एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने निश्चित ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी गुगल मॅपचा (Google Maps) वापर केला. मात्र, त्यामुळे तो चांगला अडचणीत आला. गुगल मॅपमुळे तो चांगलाच अडकला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यांनुसार, गुगल मॅप फॉलो केल्यामुळे एका व्यक्तीची टोयोटा एसयूव्ही पायऱ्यांवर अडकली, त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या पथकाने मिळून या व्यक्तीला त्याच्या कारसह सुखरुप बाहेर काढलं.

शेवटी पोलिसांना बोलवावं लागलं

या विचित्र घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक गाडी पायऱ्यांच्या मधोमध अडकली आहे. गाडीबाहेर काही लोक गाडीसह चालकाची सुखरुप सुटका करण्याच्या प्रयत्नात आहेत. बचावकर्त्यांच्या एका पथकाद्वारे कार काळजीपूर्वक पायऱ्यांवरून खाली आणली आणि गाडी योग्य रस्त्यावर परतली.

नेमकं काय घडलं?

आता नेमकं झालं असं की, कार चालकाने गंतव्य स्थानी पोहोचण्यासाठी गुगल मॅप चालू केला. त्यानंतर लोकेशनवर लवकर पोहोचण्यासाठी त्याने फास्टर रुटचा पर्याय निवडला. यानंतर जे घडलं, ते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. 

पाहा व्हायरल व्हिडीओ :

अनेक गुगल मॅप वापरकर्त्यांनी नेव्हिगेशन ॲपमध्ये यासारख्या अनेक समस्या येत असल्याचा उल्लेख करून त्यांच्या चिंता व्यक्त केली आहे. एका युजरने त्याचा अनुभव शेअर करताना सांगितलं की, “मला अलीकडेच Google Maps मध्ये समस्या येत आहे. हे काहीवेळा असे रस्ते दाखवते ज्यावर फक्त बाईकनेच प्रवेश करता येतो.”

आणखी एका युजरने प्रश्न विचारला आहे की, “गुगल मॅप चुकीचा आहे, हे मान्य आहे. पण तो माणूस डोळे मिटून गाडी चालवत होता का? नाहीतर त्याला पायऱ्या दिसल्या नाही, हे शक्यच नव्हते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed