नवी दिल्ली: कथित मनी लाँडरिंगप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत आले आहेत. ईडीच्या पथकानं सोमवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकला. ‘ईडी’ने यापूर्वी २० जानेवारीला रांची येथील सोरेन यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांची चौकशी केली होती. दिल्ली पोलिसांसह ‘ईडी’चे अधिकारी सोमवारी सकाळी ९च्या सुमारास दक्षिण दिल्लीतील निकेतन इमारतीत असलेल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. मात्र, दिल्लीतील निवासस्थानी हेमंत सोरेन न भेटल्यानं शोध सुरु आहे. बिहारमध्ये २७ वर्षांपूर्वी जे घडलं त्याची पुनरावृत्ती होणार का अशा देखील चर्चा सुरु आहेत.
गेल्या आठवड्यातच ‘ईडी’ने त्यांना २९ ते ३१ जानेवारीदरम्यान चौकशीसाठी समन्स बजावले होते. सोरेन यांनी या समन्सला उत्तर पाठवले होते, मात्र नेमका दिवस सांगितला नव्हता. मात्र, २७ जानेवारीला ते रांचीहून दिल्लीत आले होते. २० जानेवारीला चौकशी पूर्ण न झाल्याने त्यांना नवे समन्स बजावण्यात आल्याचेही सांगितले जाते. ईडीकडून हेमंत सोरेन यांचा गेल्या २४ तासांपासून शोध सुरु आहे. सोमवारी ईडीचं पथक सोरेन यांच्या निवासस्थानी दाखल झालं पण ते सापडले नाहीत हेमंत सोरेन यांच्याबाबत ईडीला माहिती मिळाली नाही.
बिहारमधील त्या घटनेची पुनरावृत्ती होणार?
भाजप नेत्यांनी हेमंत सोरेन रस्ते मार्गे झारखंडमध्ये पोहोचून कल्पना सोरेन यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करतील, असा दावा केला आहे. हेमंत सोरेन यांनी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री केल्यास बिहारमध्ये २७ वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. विशेष बाब म्हणजे त्यावेळी झारखंड हा बिहारचा भाग होता.
लालूप्रसाद यादव यांनी काय केलेलं?
हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. झारखंडमधील कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सोरेन अडचणीत आले आहेत. ईडीनं सोरेन यांना १० वं समन्स दिलेलं होतं. सोरेन यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता ते पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करु शकतात. लालू प्रसाद यादव हे १९९६ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर चारा घोटाळ्याचे आरोप झाले, सीबीआयनं कारवाई सरु करताच राजकीय स्थितीमुळं लालू प्रसाद यादव यांना कारभार करणं अडचणीचं ठरू लागलं. लालू प्रसाद यादव यांचं राजकारण संपते की काय अशा चर्चा सुरु होत्या, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.
२५ जुलै १९९७ ला लालू प्रसाद यादव यांनी सर्वांना आश्चर्यचकीत करुन टाकणारा निर्णय घेतला. त्यांनी पत्नी राबडी देवी यांना बिहारचं मुख्यमंत्री केलं. राबडीदेवी मुख्यमंत्री बनल्या पण निर्णय लालू प्रसाद यादव घ्यायचे. राबडी देवी यांनी १९९७ ते १९९९, १९९९ ते २००० आणि २००० ते २००५ या वर्षांमध्ये बिहारचं मुख्यमंत्रिपद भूषवलं
कोण आहेत कल्पना सोरेन?
कल्पना सोरेन या ओडिशातील मयूरभंज मधील व्यावसायिक कुटुंबातून येतात. रांचीच्या सरकारी महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं. ७ फेब्रुवारी २००६ ला त्यांनी हेमंत सोरेन यांच्याशी विवाह केला. महिला सशक्तीकरणासाठी त्या कार्यरत असतात. राजकीय कुटुंबातील असल्यानं त्यांच्यावर आपत्कालीन स्थितीत मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
विशेष बाब म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार डॉ. सरफराज अहमद यांनी वैयक्तिक कारणामुळं राजीनामा दिला आहे, त्यामुळं त्यांची जागा रिक्त आहे. हेमंत सोरेन यांना ईडी कारवाईमुळं तुरुंगात जाण्याची वेळ आल्यास कल्पना सोरेन मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यासाठीच सरफराज अहमद यांनी राजीनामा दिल्यांच बोललं जातंय. या रिक्त जागेवरुन कल्पना सोरेन विधानसभेत जाऊ शकतात.