रांची: जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र रांचीहून दिल्लीला रवाना झालेले हेमंत सोरेन बेपत्ता झाले आहेत. सोमवारी सकाळी ईडीचे पथक हेमंत सोरेन यांच्या दक्षिण दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले.मात्र, त्याठिकाणी सोरेन आढळून आले नाहीत. ईडीच्या पथकाने बराच वेळ सोरेन यांची वाट पाहिली मात्र सोरेन निवासस्थानी आलेच नाहीत. यानंतर ईडीच्या पथकाने सोरेन यांच्या ड्रायव्हरला आणि स्टाफला घेऊन एक- दोन संभाव्य ठिकाणांवरही तपास केला मात्र हेमंत सोरेन सापडले नाहीत. सर्च वॉरंट घेऊन पोहचलेल्या ईडीच्या पथकाने सोरेन यांच्या निवास्थानी कागदपत्रे शोधली. जवळपास १५ तासाच्या तपासणीनंतर रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान ईडी पथकाने सोरेन यांचे निवासस्थान सोडले. यावेळी काही कागदपत्रे आणि एक बीएमडब्लू कार या पथकाने ताब्यात घेतली.

सोरेन यांनी ३१ जानेवारी रोजी ईडीच्या पथकाला बोलावले होते
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीवर राजकीय हेतूने प्रेरित होऊन निवडून आलेल्या सरकारला काम करण्यापासून रोखल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी 20 जानेवारीला ईडीने विचारलेले प्रश्न चुकीचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान मुख्यमंत्री सोरेन यांनी ३१ जानेवारी रोजी ईडीला चौकशी करण्यासाठी घरी बोलावणे धाडले होते.
सोरेन दिल्लीतच- झारखंड मुक्ती मोर्चाचा दावा
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याने सोरेन नेमके कुठे आहेत याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याबाबत झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रवक्ते सुप्रियो भट्टाचार्य म्हणाले की, मुख्यमंत्री आपल्या वैयक्तिक कामाकरिता दिल्लीला गेले आहेत. ते दिल्लीतच असून काम होताच राज्यात परततील. मात्र, मुख्यमंत्री सोरेन दिल्लीत कुठे आहेत या प्रश्नाचे उत्तर भट्टाचार्य यांना देता आले नाही.