• Tue. Apr 29th, 2025

भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही, वेळ आली तर मी पक्षश्रेष्ठींशी बोलेन : फडणवीस

Byjantaadmin

Jan 29, 2024

नागपूर : आमचं सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींच्या हक्कांचं जतन करावं लागेल, हे स्वत: मुख्यमंत्र्यांना देखील माहिती आहे. भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही. वेळ आली तर मी आमच्या पक्षश्रेष्ठींशी बोलीन, अशा शब्दात ओबीसी आरक्षणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले दिले जाणार नाहीत, ज्यांच्या कुणबी नोंदी मिळतील, त्यांनाच दाखले दिले जातील, असंही फडणवीस यांनी नि:क्षून सांगितलं.

ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यांची रोखठोक भूमिका

नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही माहित आहे की, आपल्याला ओबीसी समाजाचे संरक्षण करायचे आहे. त्यामुळे त्यांचीही भूमिका स्पष्ट आहे. मला स्पष्टपणे सांगायचे आहे, जोपर्यंत भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत काहीही झाले तरी आम्ही ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. उद्या जर अशी वेळ आली की, ओबीसीला संरक्षण देता येत नाही, तर मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन, पण काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही.

सरसकट दाखले नाहीत, ज्यांच्या कुणबी नोंदी त्यांनाच दाखले!

मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले दिले जाणार नाहीत, ज्यांच्या कुणबी नोंदी मिळतील, त्यांनाच दाखले दिले जातील. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची महायुती सरकारची भूमिका आहे, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.

भुजबळांशी मी चर्चा करेन

भुजबळांच्या म्हणण्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले की, “मी स्वत: भुजबळांशी या विषयावर चर्चा करणार आहे. त्यांना जे काही आक्षेप असतील ते सांगावेत. कुठेही ओबीसींवर अन्याय होत असेल, तर त्यात नक्कीच बदल करू. ज्या काही सुधारणा करायची आहे ते करु. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही.”

सरकारची भूमिका बॅलन्स आहे

फडणवीस म्हणाले, “मराठा आरक्षणासंबंधी घेतलेला निर्णय हा घाईने घेतलेला निर्णय नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना दाखले मिळतील, यासाठी हा निर्णय आहे. त्यामुळे आरक्षणाप्रकरणी येणारा डेटा यावर प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा करणे योग्य नाही. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबद्दल सरकारची भूमिका बॅलन्स आहे. आम्ही कोणाचेही नुकसान होऊ देणार नसल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed