राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेतेमंडळींकडून नेहमीच राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. विशेषतः अजित पवार गटाच्या नेत्यांकडून सातत्याने मागणी करीत हा मुद्दा चर्चेत ठेवला जातो.
गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा महिला मेळावा पार पडला. यावेळी महिला आघाडीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमधील उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचा महिला मेळावा गुरुवारी पार पडला. या मेळाव्यासाठी सर्व समाजघटकातून महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या.
यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या, अजितदादा यांनी जो निर्णय घेतला, त्या निर्णयासोबत आम्ही सर्व महिला आहोत, यासाठीच हा मेळावा घेतला आहे. महिलांना सगळं कळतं, असे म्हणत या निर्णयासोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी काळात अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवावे, असे सर्व महिलांना वाटते. त्यांच्या या मागणीला महिलांचा एकमुखी पाठिंबा असून राज्याचे नेतृत्व बदलण्याची ताकद या महिलाशक्तीत आहे, असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले.