नांदेड लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग काँग्रेसने महिला मेळाव्यात फुंकले आहे. महिला मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे संपूर्ण कुटुंब या मेळाव्यात हजर होते. त्यामुळे नांदेड मधून काँग्रेसची उमेदवारी अशोक चव्हाण यांनाच मिळणार असे निश्चित मानले जाते.लोकसभा निवडणूकीची घोषणा केव्हाही होऊ शकते,असे गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी जोमाने सुरू केली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस कोणाला निवडणूकीच्या मैदानात उतरवणार? हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. महिला मेळाव्यात नांदेडची जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात जोरदार लढत झाली. यात चव्हाणांचा पराभव झाला होता. परंतु यावेळी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होण्याची शक्यता लक्षात घेता नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण हेच उमेदवार असतील,असे पदाधिकारी व कार्यकर्ते सांगत आहेत.
महिला मेळाव्याच्या तयारीची सर्व जबाबदारी चव्हाणांचे विश्वासु सहकारी माजी आमदार अमरनाथ राजूरकर, किशोर स्वामी, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्यावर टाकण्यात आली होती. या मेळाव्याच्या तयारीवर चव्हाणांचे लक्ष होते.भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार चिखलीकरांनी निवडणूकीची गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी अशोक चव्हाण उमेदवार असले पाहिजे, असे पदाधिकारी व कार्यकर्ते ठामपणे सांगत आहेत.काँग्रेसकडे अशोक चव्हाण यांच्या शिवाय दुसरा सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे तेच उमेदवार असतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. माजी आमदार अमिता चव्हाण, श्रीजया व सुजया चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्या प्रचाराची जबाबदारी प्रत्येक निवडणुकीत सांभाळली आहे. कालच्या काँग्रेस महिला मेळाव्यात या तिघीही पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले.नांदेड लोकसभेची जागा पुन्हा जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशावेळी अशोक चव्हाण यांच्या ऐवजी इतर कुठल्या उमेदवाराचा विचार करणे जोखमीचे ठरू शकेल आणि काँग्रेस सध्या कुठलीही जोखीम पत्करण्याच्या मानसिकतेत नाही. या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहून अशोक चव्हाण हे खुश दिसून येत होते. मेळावा यशस्वी झाल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
