• Wed. Jun 18th, 2025

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा?

Byjantaadmin

Jan 27, 2024

नांदेड : मराठवाड्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून आता नांदेड लोकसभेकडे पाहिलं जातंय. काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय गृह मंत्री आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा गड म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे नांदेड. पुढे अशोक चव्हाण यांनी हा पूर्ण जिल्हा आपल्या हातात ठेवला, त्याच्यावर एकहाती वर्चस्व ठेवलं. 

काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं. आतापर्यंत 17 पैकी 14 वेळा लोकसभेच नेतृत्व हे काँग्रेसकडे होते. मुख्यमंत्रीपदी विराजमन असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा ते विधानसभापर्यंत कॉंग्रेसला अच्छे दिन आणले होते. 

सन 2014 ला मोदी लाटेत काँग्रेसने अशोक चव्हाण यांना मैदानात उतरवले, त्या वेळेला त्यांचा सामना भाजपचे डी बी पाटील यांच्यासोबत रंगला. त्यावेळेला काँग्रेसचे जेष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांना डावलून चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. 2010 ला आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उत्तर व्हावं लागलं होतं. सत्तेत असूनसुद्धा अशोक चव्हाण कुठल्या पदावर नव्हते.

मोदी लाटेतही काँग्रेसचा झेंड फडकला

एकीकडे अशोक चव्हाण यांच्यावर घोटाळ्याचा आरोप आणि दुसरीकडे मोदी लाट, असं असतानाही अशोख चव्हाण यांनी 2014 ची लोकसभा ही 80 हजारांनी जिंकली. 2014 साली काँग्रेसला हिंगोली आणि नांदेड सोडलं तर कुठेही यश आले नाही. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी विधानसभेत देखील पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भोकर आणि नांदेड उत्तर मतदारसंघात कॉंग्रेसचा झेंडा फडकत ठेवला. तसेच 2017 साली महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसची एकहाती सत्ता आणली.

महापालिकेचा विजय हा काँग्रेससाठी विशेषतः हा अशोक चव्हाण यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण लढाईही भाजपशी होती आणि विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सोबत चव्हाण यांचा सामना होता. हा सामना जरी चव्हाण यांनी जिंकला असला तरी चिखलीकर यांच्यामुळे चव्हाण यांना नांदेडमध्ये थांबून राहावं लागलं होतं. 

प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये दोन तगडे उमेदवार. चव्हाणांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी चिखलीकर यांचा रूपाने भाजपला लोकसभेचा उमेदवार मिळाला. पुढे 2019 ला चिखलीकर याना भाजपने मैदानात उतरवले आणि अशोक चव्हाण यांच्या पुढे आव्हान उभे केले. 

वंचितने बाजी पलटवली आणि अशोक चव्हाण पडले (Nanded Lok Sabha Election Result 2019)

चित्रपटात जसा ट्विस्ट येतो तसाच ट्विस्ट वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने आला. धनगर समाजाचे नेते प्राध्यापक यशपाल भिंगे याना वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यानंतरही तिरंगी लढत होईल अशी काही परिस्थिती नव्हती. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या सभेने मात्र सगळ्यांचे नियोजन बिघडवले. या मतदारसंघात सर्वाधिक 585 सभा झाल्या. 2014 ची पुनरावृत्ती होईल असा अंदाज सर्वांना होता, मात्र निकाल हा चिखलीकर यांचा बाजूने लागला.

चिखलीकर यांनी 4 लाख 86 हजार मतं घेत विजय मिळवला आणि यात किंगमकेर ठरले ते वंचितचे उमेदवार, ज्यांनी 1 लाख 66 हजार मतं घेतली. तर अशोक चव्हाण यांना 4 लाख 46 हजार मतं मिळाली. अशोक चव्हाण यांचा हा लोकसभेतला हा दुसरा पराभव ठरला. याआधी डॉ. व्यंकटेश काबदे यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. भाजपने लोकसभेची जागा ही 2004 नंतर 2019 ला जिंकली. 

विधानसभेच्या निवडणुकीत अशोक चव्हाणांचे कमबॅक 

बदलेलं समीकरण आणि राजकारण या दृष्टीने नांदेड लोकसभेच्या विजयाने भाजपचा आत्मविश्वास वाढलेला होता. विधानसभेचे 9 मतदारसंघ जिंकण्याची तयारी करत अशोक चव्हाण यांनी आपला पारंपरिक मतदारसंघ भोकर निवडला आणि काँग्रेसचे उमेदवार मैदानात उतरवले. चिखलीकर यांनी पण आता चव्हाण यांना अडकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर याना मैदानात उतरवले. मात्र जिंकण्यासाठी अशोक चव्हाण यांनी सगळे मतदारसंघ पिंजून काढत 9 पैकी 4 मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकवला आणि भाजपसहित चिखलीकर यांना धक्का दिला. 

पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी

लोकसभेचा पराभव हा चव्हाण यांना चांगला फायद्याचा ठरला. पुढे महाविकास आघाडीचे सरकार आले आणि चव्हाण हे पुन्हा मंत्रिमंडळात सामील झाले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. पालकमंत्री झाल्यानंतर चव्हाण यांनी पोटनिवडणुकीत सुद्धा चिखलीकरांना झटका दिला. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती करू म्हणत पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार उतरवला. त्या निवडणुकीतही अशोक चव्हाण यांची सरशी झाली. 

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा

महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी बंड करत eknath shinde यांच्यासोबत जायचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. एकीकडे वंचित आघाडी महाविकास आघाडीसोबत यावी अशी माझी वैयक्तिक इच्छा असल्याचं अशोक चव्हाण सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि खासदार हे अजून बरेच नेते आमच्या पक्षात येणार असल्याचं सांगण्यात व्यस्त आहेत. मात्र अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्येच राहतात की भाजपमध्ये जातात यावर nanded च्या लोकसभेचा निकाल अवलंबून आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *