नाशिक : ज्यांनी तुम्हाला गादीपर्यंत पोहोचवलं, त्यांचंच वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होता? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल चढवला. कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. अजिबात नाही, त्रिवार नाही… शिवरायांशी तुलना कदापि शक्य नाही, असं ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
जसे संत रामदास स्वामींचे मनाचे श्लोक होते, तसेच संजय राऊत यांनी सामनाचे श्लोक सांगितले. श्रीरामाचा अनुयायी म्हणून माझा उल्लेख केला, त्याबद्दल मी आभारी आहे. प्रभू रामचंद्र यांच्याकडून संयम, एकवचनी, एकपत्नी हे गुण घेतले. आता रावणाचे मुखवटे फाडायचे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.कालच्या सोहळ्यात कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. अजिबात नाही, त्रिवार नाही… शिवरायांशी तुलना कदापि शक्य नाही, असं म्हणत गोविंदगिरी महाराजांनी केलेल्या तुलनेवरुन ठाकरेंनी ताशेरे ओढले. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज राम मंदिर उभं राहिलं नसतं. नरेंद्र मोदी इतक्या वर्षात अयोध्येला गेले नव्हते, जगभर फिरले, लक्षद्वीपला गेले, पण मणीपूरला गेले नाहीत, अयोध्येत गेले नाहीत, कदाचित जसे आमचे फडणवीस गेले होते, तसे मोदी पंतप्रधानपद मिळण्याआधी गेले असतील, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.आपला इतिहास आहे, जो महाराष्ट्रावर आला, त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. मग तो अफझलखान असो किंवा औरंगजेब. प्रभू रामचंद्र ही कोणा एका पक्षाची प्रॉपर्टी नाही. नाहीतर आम्हालाही भाजपमुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. जय श्रीराम ऐवजी भाजपमुक्त जय श्रीराम म्हणावं लागेल. प्रभू रामचंद्र एक सत्यवचनी होते. मग तुम्हाला गादीपर्यंत पोहचवणाऱ्यांचं वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होता? राम की बात झाली, काम की बात करा, काँग्रेस सोडा, गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केलंत? असा सवाल ठाकरेंनी विचारला.
