मुंबई : भारतातील सर्वात लांब सागरी सेतू या नव्याने उदघाटन झालेल्या अटल सेतूवर रविवारी अपघात झाल्याची घटना घडली आहे. दोन महिला आणि तीन मुलांना घेऊन जाणाऱ्या मारुती कारचा ताबा सुटून ती रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्यांना किरकोळ दुखापत झाली. हे प्रवासी चिर्लेहून मुंबईला जात होते. ही घटना कॅमेऱ्यातही कैद झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक किंवा अटल सेतूवर झालेला हा पहिला अपघात आहे. ही घटना दुपारी ३:०० च्या सुमारास घडली. हॅचबॅकच्या मागे असलेल्या कारच्या डॅशकॅम फुटेजमध्ये वाहन लेन ओलांडून रेलिंगवर आदळताना दिसली. यात प्रवास करणाऱ्या दोन महिला आणि मुलांसह सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे.
First Accident on MTHL!
— Roads of Mumbai (@RoadsOfMumbai) January 21, 2024
In Ravi Shashtri's words: Thodi der ke liye….(those who know, know)
Literally pic.twitter.com/UK0TJfL7Kb

रविवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान कार दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला. सुमारे पाच जणांना घेऊन जाणारे हे वाहन सुसाट वेगाने जात असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि ते दुभाजकाला धडकले आणि उलटले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. पनवेल येथील रहिवासी झारा साकीर (३२) ही कार चालवत होती. न्हावा शेवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिंदे यांनी सांगितले की, “कारमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
रविवारी घडलेल्या घटनेमुळे पुलावर वर्दळ असल्याने इतर वाहनधारकांची गर्दी निर्माण झाली होती. मात्र, वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात आली. खराब झालेली कार बाजूला करण्यात आली. प्रवाशांना त्यांच्या नातेवाईकांनी घरी नेले, तर वाहन सध्या पोलीस ठाण्यात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ जानेवारी रोजी मुंबईत अटल सेतूचे उद्घाटन केले होते. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करणारा देशातील सर्वात लांब सागरी पूल आहे. शिवडीपासून सुरू होणारा आणि न्हावा शेवा येथे संपणारा हा पूल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग यासारख्या महत्त्वाच्या भागांना जोडतो.