नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. प्रभू रामचंद्र अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होतील. या सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्येत सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं संपूर्ण देशात अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारनं याबद्दलचा आदेश जारी केला आहे.
केंद्र सरकारनं जारी केलेल्या आदेशात अर्धा दिवस सुट्टीचा उल्लेख आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना आणि त्यांचा आग्रह लक्षात घेता केंद्र सरकारनं अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असताना, २२ जानेवारीला देशभरातील सर्व केंद्रीय कार्यालयं, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक संस्था, कार्यालयांमध्ये दुपारी अडीचपर्यंत अर्धा दिवस सुट्टी असेल. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण अधिकाधिक लोकांना पाहता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिराच्या लोकार्पणाला केवळ तीन दिवस राहिले आहेत. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या मंत्र्यांकडून घेतला. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या दिवशी दिवाळीसारखा उत्सव साजरा करण्याच्या सूचना करण्यात आल्या. २२ जानेवारीला आपल्या घरात दीप प्रज्वलित करा आणि गरिबांना जेऊ घाला, अशा सूचना देण्यात आल्या.अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्यात रामललाची प्रतिष्ठापना करण्यात येईल. या ठिकाणी ५ मंडप असतील. मंदिर तळमजल्यावर असून इथल्या भागाचं काम पूर्ण झालं आहे, अशी माहिती राम मंदिर निर्माण समितीचे चेअरमन नृपेंद्र मिश्रा यांनी दिली. मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील थोडं काम शिल्लक आहे. इथे राम दरबार असेल. मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर विविध प्रकारचे यज्ञ आणि धार्मिक विधी होतील, असं त्यांनी सांगितलं.