मैदानांची संख्या वाढली तर दवाखान्यांची संख्या कमी होईल- डॉ. पियुष जैन
निलंगा- ग्रामीण भागापर्यंत देशात खेळल्या जाणाऱ्या विविध खेळांची माहिती जाणे आवश्यक आहे. शालेय जीवनापासून जर विद्यार्थी मैदानावर खेळले तर ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फलदायी आहे. विद्यार्थ्यांसाठी त्या प्रकारच्या सुविधा “खेलो इंडिया स्कीम”च्या मार्फत उपलब्ध होऊ शकतात. यातून मैदानांची संख्या वाढली तर दवाखान्यांची संख्या कमी होईल असे मत फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली येथील सचिव डॉ. पियुष जैन यांनी व्यक्त केले. ही संस्था नॅशनल स्पोर्ट्स प्रमोशन ऑर्गनायझेशन, युवा व खेल मंत्रालय, भारत सरकार. याच्या अंतर्गत कार्य करते. महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील क्रीडा विभाग व फिजिकल फाउंडेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्यात झालेल्या सामंजस्य करारातर्गत “खेलो इंडिया स्कीम २०२१ ते २०२६” या कार्यक्रमांतर्गत आभासी कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे संचालक डॉ. सिंकू कुमार सिंग, बोर्ड ऑफ स्पोर्टचे डॉ. कैलास पाळणे, एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबई येथील क्रिडा संचालिका डॉ. कविता खोलगडे, वरिष्ठ जलतरण प्रशिक्षक व भारतीय क्रीडा प्राधिकरण नवी दिल्ली येथील श्री.संजय बिस्ट, राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण व भारतीय खेल प्राधिकरण तिरुअनंतपुरम येथील डॉ. महेंद्र सावंत यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपूके यांनीही या आभासी कार्यशाळेत सहभाग नोंदवला. “खेलो इंडिया स्कीम २०२१ -२०२६” अंतर्गत युवा व खेल मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत दील्या जाणाऱ्या योजनाची माहिती व खेळांची सुविधा अत्याधुनिक करण्यासाठीं प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासंदर्भात या कार्यशाळेत महिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ.गोपाळ मोघे यांनी केले तर चर्चासत्राचा मसुदा डॉ. अजित मुळजकर यांनी विशद केला. या आभासी कार्यशाळेसाठी लखनऊ, मुंबई, गोवा या ठिकाणाहून क्रिडा संचालक व खेलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.