फी भरली नाही म्हणून परीक्षेला बसू दिले नाही! ठाण्यातील लिटिल फ्लॉवर हायस्कुलचा मनमानी कारभार.
(ठाणे, प्रतिनिधी)फी न भरल्यामुळे तुम्हाला परीक्षेला बसू देणार नाही असं बेधडकपणे लहान मुलांना सांगणारे शिक्षक असू शकतात का..? ही घटना आहे ठाण्यातील प्रसिद्ध अशा लिटिल फ्लॉवर हायस्कुल या शाळेची. याच शाळेतील एक पालक राहुल पवार याबाबत सांगताना म्हणाले, माझा मुलगा आणि मुलगी या शाळेत पहिलीपासून शिकत आहेत. परीक्षेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे आज दि.१६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजता माझ्या मुलाला घेऊन शाळेत आलो. तासाभराचा पेपर असल्याने त्याला सोडून शाळेबाहेरच थांबलो. 8 वाजता मुलगा रडत बाहेर आला, विचारपूस केली असता कळले की, तुझी शाळेची फी भरलेली नाही म्हणून आम्ही तुला पेपर लिहायला देणार नाही. परीक्षेला बसायचे असेल तर फी घेऊन ये! असं शिक्षकांनी त्याला सांगितलं. बाकीच्या मुलांसमोर त्यांनी वाट्टेल तशी बडबड केली. मी तडक मुलाला घेऊन प्रिन्सिपॉल ऑफिसवर गेलो. तिथे असलेला शिपाई उडवाउडवीची उत्तरे देऊन हुज्जत घालू लागला. हे सर्व घडत असताना परीक्षेला न बसू दिलेल्या इतरही मुलांचे पालक जमा झाले. त्यातल्या काही पालकांनी फी भरून सुद्धा शाळेच्या अंतर्गत गोंधळामुळे फी भरल्याची पावती न मिळाल्यामुळे त्यांच्या मुलांना परीक्षेला बसू दिले गेले नव्हते. शिक्षण ही मूलभूत गरज आहे. आर्थिक अडचणीमुळे वेळेत फी भरली नाही म्हणून मुलांना परीक्षेला बसू न देणं कितपत योग्य आहे. आज मुलं पालकांपेक्षा शाळेत शिक्षकांसोबत जास्त काळ असतात. बालमनावर संस्कार करण्याचं महत्वाचं काम त्यांच्याकडे असतं. अशावेळी ‘रोज घरी जेवण जेवता ना तुम्ही… मग तुम्हाला फी भरता येत नाही.’ अर्थिक अडचणीमुळे पालकांनी वेळेत फी भरली नाही म्हणून मुलांना असं अद्वातद्वा बोलण्याचा अधिकार शाळेला मिळत नाही. या सर्व प्रकाराचा त्या मुलांच्या बालमनावर काय दूरगामी परिणाम होईल याचा जराही विचार या तथाकथित शिक्षण संस्थेने वा त्यातील संबंधित मुख्याध्यापिकेने करू नये. तद्दन व्यावसायिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या या शाळेत पाणी ,शौचालय आधी प्राथमिक सुविधासुद्धा व्यवस्थित नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील या शाळेच्या प्रिन्सिपलना मराठी तर सोडा साधं हिंदी सुद्धा धड बोलायला जमत नव्हते. एवढा गदारोळ झाल्यानंतरही शाळेच्या प्रिन्सिपलने झाल्या प्रकरणाची माफी मागितली नाही. उलट स्थानिक पोलिस ठाण्यातील वैयक्तिक संबंधाचा वापर करून पोलिसांकरवी पालकांना बाहेर काढण्यात आले. लॉकडाऊन मध्ये बऱ्याच शाळेंनी विद्यार्थ्यांची फीस माफ केली पण या शाळेने कोणताही दयाभाव दाखवला नाही. मुलांच्या शिक्षणात खंड नको म्हणून पालकांनीही ती निमूटपणे दिली. असं असूनही विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करायचे सोडून त्यांना शिक्षणापासून वंचित करणे थांबवलं गेलं पाहिजे. आमची राज्यसरकारला विनंती आहे की केवळ ठाण्यातील लिटिल फ्लॉवर हायस्कुल शाळाच नव्हे, महाराष्ट्रात ज्या काही खाजगी शाळा आहेत या प्रत्येक शाळेवर शासनाचा अंकुश हा असलाच पाहिजे. आणि आर्थिक विवंचनेमुळे कुणाचा शिक्षणाचा अधिकार नाही डावलला पाहिजे.