धार्मिक मुद्द्यांवरून लोकांची मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अयोध्येतील जय श्रीराम, हनुमान यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, भाजप आणि आरएसएसकडून मतांसाठी फायदा करून घेतला जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. ते आज निपाणी दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी राम मंदिर मुद्यावरून भाजप आणि पीएम मोदी यांच्यावर सडकून टीकास्त्र सोडले.
यावेळी बोलताना त्यांनी इतिहासाची सुद्धा आठवण करून दिली. शरद पवार बोलताना म्हणाले की, मशीद पडल्यानंतर राम मंदिर बांधण्याचा निर्णय राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये झाला होता. राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास करण्यात आला. मात्र, आता राम मंदिराचे काम बाजूला राहिलं आहे आणि भाजप आणि आरएसएसकडून याचा मतासाठी फायदा करून घेतला जात आहे.
रीबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का?
शरद पवार पुढे म्हणाले की, राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरीबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली. पीएम मोदी करत असलेल्या दहा दिवसांच्या उपवासावर शरद पवारांनी खोचक शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले की, मोदी दहा दिवस उपवास करत आहेत, त्यांनी तसाच उपवास लोकांची उपासमार घालण्यासाठी सुद्धा करावा अशी टीका त्यांनी केली शरद पवार यांनी यावेळी बोलताना त्यांनी घेतलेल्या कार्यकाळातील निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. मात्र, आज देखील शेतकरी कर्जामध्ये आहे. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणतीही आस्था नाही. या देशांमध्ये उद्योगपतींची कर्ज माफ होतात, मात्र शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाहीत. देशात चुकीची आर्थिक धोरणे राबवली जात आहेत. या चुकीचं धोरण राबवऱ्यांना लोकांना बाजूला केले पाहिजे, असेही ते म्हणाले. कर्नाटकमधील निकाल हा विरोधकांचा आत्मविश्वास वाढवणारा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कर्नाटकात बजरंग बलीचा आधार घेतला
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. जयंत पाटील म्हणाले की, ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत उत्साह दिसला होता तसाच उत्साह आज दिसत आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत उत्तम पाटील हे आगामी निवडणुकीत आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. काळ बदलला आहे, देशातील परिस्थिती वेगळी आहे. कर्नाटकात बजरंग बलीचा आधार घेतला होता. आता देशात रामाचा आधार घेतला जात आहे. महत्व आणि गरज नसलेल्या गोष्टी जनतेसमोर ठेवल्या जातात. महागाई आणि इतर समस्या झाकून ठेवण्यासाठी इतर गोष्टी केल्या जातात, असा टोलाही त्यांनी लगावला.