• Sat. May 3rd, 2025

मुंबई गाठण्याचा सकल मराठा समाजाचा निर्धार लातुरात जिल्हास्तरीय बैठक, नियोजन ठरले, तयारी सुरू

Byjantaadmin

Jan 16, 2024

लातूर, प्रतिनिधी  मुबंई येथे मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे यांच्या नियोजित उपोषणास पाठींबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातून हजारो वाहनांच्या माध्यमातून मराठा समाजबांधव मुंबईस रवाना होणार असून या संभाव्य दौऱ्याच्या नियोजन अन वेळापत्रकावर सोमवारी (दि.१५) येथील राहिचंद्र मंगल कार्यालयात झालेल्या सकल मराठा समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीस जिल्हयातील विविध तालुके व गाव – शहरातील समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पुजनाने बैठकीस सुरुवात झाली. त्यानंतर समाजबांधवांनी मनोगत व्यक्त केले व त्यांच्या नियोजनाची रुपरेषा सांगितली. दरम्यान या दौऱ्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले असून ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, कार तसेच सार्वजिनक वाहनांनी अनेकजण जाणार आहेत. त्यांच्यासमवेत खाण्याचे साहित्य असणार आहे. एका वाहनासमवेत दोन स्वयंसेवक असतील व ते त्या वाहनातील समाजबांधवांची काळजी घेतील. ज्येष्ठ नागरीक ,गंभीर आजार असलेले समाजबांधव, १५ ते १८ वर्षाच्या मुलांना या दौऱ्यासाठी टाळावे अशी सुचना यावेळी करण्यात आली. दौऱ्यादरम्यान कोणी समाजकंटक घुसू नये याची खबरदारी घ्यावी,आवश्यक असलेल्या औषधी गोळ्या सोबत ठेवाव्यात व त्या वेळेवर घ्याव्यात. सोबत शिधा घ्यावा व एकमेकांशी संपर्कात रहावे, कुठेही व कसलेही गालबोट या आंदोलनास लागणार नाही याची काळजी प्रत्येकांनी घ्यावी अशा सुचना यावेळी करण्यात आल्या. ज्या मराठा बांधवांना २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणाऱ्या पायी दिंडीत सहभागी व्हायचे आहे ते १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता निघतील, ज्यांना पुणे येथून या दिडींत सामील व्हायचे आहे ते २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता तर ज्याला थेट मुंबई गाठावयाची आहे ते २६ जानेवारी सकाळी रोजी निघतील. या साऱ्यांचे प्रस्थान दिलेल्या वेळेत लातूर येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करुन होईल. दरम्यान नियोजीत दौऱ्याच्या नियोजन अन सुचनांबाबत समाजमाध्यमे, बॅनर्स पोस्टर्स व प्रत्यक्ष भेटीतून समाजबांधवांना वेळोवेळी सांगण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *