गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसचे नऊ खासदार पडले, त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे पाहावं लागेल असं महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणयांनी केलं आहे. त्यांनी व्यवहारिक मागणी करून आमच्यासोबत आलं पाहिजे, ते जर आले नाहीत तर गेल्या वेळी केला तोच प्रयत्न आहे का हे तपासावं लागेल असंही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,” प्रकाश आंबेडकर यांनी व्यवहारिक मागणी करून बाबासाहेबांचे संविधान वाचवलं पाहिजे. जास्तीत जास्त लोक उभी करून काँग्रेसचे मतांमध्ये विभाजन करणे आणि उमेदवारांना पाडणं ही मोदींची स्टॅटीजी आहे. त्यामुळे राजू शेट्टी असतील किंवा प्रकाश आंबेडकर, यांनी उमेदवार उभे केले तर फायदा आणि तोटा कोणाला होणार हे स्पष्ट आहे.”पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हे मला आत जाऊन पाहता येणार नाही. मात्र मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यामुळे आमचे नऊ खासदार पडले हे खरं आहे. जर ते आमच्या सोबत आले नाही तर गेल्या वेळी केलं तोच प्रयत्न आहे का अशी शंका निर्माण होईल. मात्र मला वाटतं ते आमच्या सोबत येतील.”
प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत आले तर देशाचे नेते होतील
प्रकाश आंबेडकर जर आमच्या सोबत आले तर देशाचे नेते होतील, कारण देशात आंबेडकर हे नाव दुसऱ्या कोणाकडेच नाही. प्रकाश आंबेडकर सर्वांना ओळखतात, त्यामुळे त्यांनी जाऊन म्हटले की मला यायचं आहे तर त्यांना कोण नाही म्हणणार नाही. त्यांनी मलिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे. मात्र ते एका प्रवक्त्याच्या नावाने लिहिलं आहे. त्यामुळे तो खरगेंचा अपमान आहे असं आम्हाला वाटतं.
उमेदवार चांगला असेल तर त्यांना जागा दिली पाहिजे
“प्रकाश आंबेडकर ज्या जागांची घोषणा करतात, त्या जागा निवडून येण्याची शक्यता किती आहे हे पाहावं लागेल. त्याचा विचार करुन त्यांनी व्यवहारिक बोललं पाहिजे. मोदींनी जर संविधान बदललं तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, संभाजीराजे, कम्युनिस्ट पक्ष या सगळ्यांशी आपण बोललं पाहिजे हे मी दिल्लीतील आमच्या नेत्यांना सांगितलं आहे. आपल्यापेक्षा जर त्यांच्याकडे चांगला उमेदवार असेल तर तसा निर्णय घेतला पाहिजे असंही सांगितलं आहे.”