चित्रपटाकडे फक्त मनोरंजन म्हणून न पाहता करिअर म्हणून पहावे- शेखर रणखांबे
निलंगा – चित्रपटात जे काही असतं ते वास्तव जरी वाटत असलं तरी ते खरं नसतं खरं हे समाजात प्रत्यक्ष पाहायला मिळतं फक्त ते शोधण्याची नजर असावी लागते. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. तो कोणता ना कोणता तरी महत्त्वाचा संदेश देत असतो तो संदेशच श्रोत्यांनी समजून घेतला पाहिजे. चित्रपट क्षेत्रामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत फक्त चित्रपटाकडे मनोरंजन म्हणून न पाहता करिअर म्हणून पहावे असे मत सुप्रसिद्ध दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी व्यक्त केले. ते निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात आयोजित दोन दिवशीय लघुपट महोत्सवात समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या कोणत्याही व्यक्तीने मानसिक अपंगत्व स्वीकारू नये असा संदेश देणारा ‘टेम्प्लेट’ व स्वच्छतेचा तसेच वास्तव हे फार भयंकर असतं असा संदेश देणारा ‘रेखा’हा लघुपट दाखवून विद्यार्थ्यांसोबत लघुपटासंदर्भात चर्चा करून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी अभिजात फिल्म सोसायटी लातूरचे सचिव श्याम जैन यांनी दिग्दर्शक शेखर रणखांबे यांची मुलाखत घेऊन त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपूके उपस्थित होते. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात त्याच घटना चित्रपटाचा विषय झालेल्या असतात, यातील दिग्दर्शकाची भूमिका महत्त्वाची असते. दोन दिवसाच्या या लघुपट महोत्सवात ती दृष्टी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दोन दिवसाच्या या लघुपट महोत्सवासाठी लघुपट यशस्वीरिता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे तांत्रिक सहाय्य सिद्धेश्वर कुंभार व सुनिल वाकळे यांनी केले.समारोप कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. नरेश पिनमकर यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. गोविंद शिवशेट्टे तर आभार डॉ.ज्ञानेश्वर चौधरी यांनी मानले.