लातूर जिल्ह्यात स्वच्छतेसाठी दशसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे


लातूर, (जिमाका) : जिल्ह्यात सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्ह) राबविण्यात येणार असून यासाठी दशसूत्री कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या स्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील नागरिक, विविध स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.डीप क्लीन ड्राईव्हच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक आणि संगीता टकले, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई व ठाणे महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हच्या धर्तीवर राज्यातील शहरी भागात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वच्छतेची दशसूत्री निश्चित करण्यात आली असून यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांना जोडणारे रस्ते, मंदिर परिसर, किल्ले, बारव, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, शासकीय रुग्णालयांचा परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी मंडई, शाळा व अंगणवाड्या परिसर, शहरासह लगतचा पाचशे मीटर परिसराची स्वच्छता या मोहीम कालावधीत होणार आहे. तसेच लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात ई-कचरा संकलन अभियान राबविले जाणार आहे. या सर्व उपक्रमांमध्ये नागरिक, स्वयंसेवी संस्था यांनी उत्सफूर्तपणे सहभाग नोंदवावा आणि जिल्ह्यातील डीप क्लीन ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
शहरालगतच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोहीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील शहरालगतच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. यासाठी लातूर शहर महानगरपालिका आणि सर्व नगरपालिका, नगरपंचायती लगतच्या भागातील ग्रामीण क्षेत्रात कचरा जमा होणाऱ्या ठिकाणांची माहिती संकलित करून येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी दिल्या.
महिला बचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी सुरू होणार ‘हिरकणी मॉल’
महिला सशक्तीकरण अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून यामध्यामातून महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी लातूरसह इतर शहरांमध्ये हिरकणी मॉल सुरू करण्यात येणार आहेत. याची सुरूवात लातूर शहरातून केली जाणार असून जिल्हा परिषद परिसर आणि महानगरपालिकेच्या परिसरात बचतगटांना उत्पादन विक्री सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर l-घुगे यांनी सांगितले.