• Sat. May 3rd, 2025

इंडिया आघाडी कडून लातुर लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची वरिष्ठ पातळीवर जोरदार फिल्डिंग

Byjantaadmin

Jan 11, 2024

 

वंचित च्या जागा मागणी मध्ये लातुर पहिल्या क्रमांकावर…

आंबेडकरांनी भाजपच्या विरोधात लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली असून महाविकास आघाडीही त्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जात आहे.

Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) / X

 

महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. या शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशपातळीवर भाजपविरोधी इंडिया आघाडीचाही वंचित भाग होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला अंतिम झाल्याचीही चर्चा आहे.यातून समोर आलेल्या माहितीनूसार वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अकोला, सोलापूर नाही, तर लातूर मतदारसंघाला पहिली पंसती दिली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपच्या विरोधात लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली असून MVA ही त्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जाते.

भाजपाला शह देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून अनेक प्रयत्न केले जात आहे. गेल्या दोन टर्मपासून सलग लातूर लोकसभेची जागा भाजपने मोठ्या मताधिक्याने जिंकली आहे. 2024 मध्ये तिसऱ्यांदा ही जागा जिंकून हॅटट्रिक साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कायम भाजपशी सेटिंगचा आरोप होणाऱ्या काँग्रेसने यावेळी मात्र ही जागा खेचून आणण्याचा निर्धार केला आहे. यासाठी महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून नव्याने समाविष्ट झालेल्या वंचित बहुजनसाठी ही जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दर्शवल्याची चर्चा आहे.इंडिया आघाडीकडून लातूरसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू आहे. या मतदारसंघातून अनेक दिग्जांनी यापूर्वी आपले नशीब आजमावले असून जिल्ह्याला शिवाजीराव पाटील निलंगेकर व विलासराव देशमुख हे दोन मुख्यमंत्री लाभले होते. लोकसभा सभापती तथा माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रदीर्घ काळ मतदार संघाचे नेतृत्व केले आहे.

प्रारंभी १९६२ मध्ये तुळशीराम कांबळे यानी तीन टर्म काँग्रेसकडून या मतदारसंघात विजय मिळवला होता. तर १९७७ साली शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील यांनाही मतदारांनी संधी दिली. तरी परंपरागत काँग्रेस पक्षाकडे असलेला लातूर लोकसभा मतदारसंघ 2004 मध्ये माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकरांच्या माध्यमातून भाजपाकडे आला. त्यानंतर 2009 मध्ये इचलकरंजीचे जयंतराव आवळे यांना विलासराव देशमुखांनी लातूरमध्ये आणले आणि ही जागा पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली.2014 पासून आजपर्यंत भाजपाकडेच हा मतदार संघ आहे. आता 2024 मध्ये पुन्हा मतदारसंघ आपल्याकडेच राहावा यासाठी केंद्र व राज्यपातळीवरून जोरदार हलचाली सुरू आहेत. तर भाजपाची हॅट्रीक रोखण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. सध्या देशभरामध्ये इंडीया आघाडीचे वारे जोरात वाहू लागले आहे. वंचित बहूजन विकास आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी जागा वाटपात सोलापूर, अकोला, लातूर, नांदेड तसेच मुंबई मधील एक लोकसभा मतदार संघ द्यावा, अशी मागणी केल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते.

चाकूरकर-निलंगेकर गटाकडून पाठींबा

लातूर लोकसभा मतदार संघ अनुसूचीत जातीसाठी आरक्षित असून पहिला दावा लातूर मतदारसंघाचा असल्याचे समजते. त्यामुळे जर जागा वाटपाच्या फार्म्युल्यात लातूर वंचित विकास आघाडीकडे गेला तर बाळासाहेब आंबेडकर यांनी येथून निवडणूक लढवावी, अशी मागणी चाकूरकर व निलंगेकर गटाकडूनही करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे प्रकाश आबंडेकर यांना आपला पाठिंबा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंबेडकरांना उमेदवारी मिळवून देऊन निवडून आणण्यासाठी खरा कस जिल्ह्यातील देशमुख आणि निलंगेकर-चाकूरकर गटाचा लागणार आहे

हॅटट्रिकचे स्वप्न भंगणार?

प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी मिळाली तर भाजपचे हॅटट्रिकचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. यापूर्वी काँग्रेसला विलासराव देशमुख यांचे नेतृत्व तारून न्यायचे. आता त्यांच्यासारखे नेतृत्व जिल्ह्यात उभे राहिले नाही, शिवाय गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या विरोधात कुमकूवत उमेदवार दिले. परिणामी भाजपसाठी लोकसभेचा मार्ग अधिक सोपा झाला. आता मात्र महाविकास आणि इंडिया आघाडीने लातूर मतदारसंघात वेगळाच विचार सुरू केल्याचे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *