• Mon. Apr 28th, 2025

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला भ्रष्टाचाराची कीड, एसीबीच्या महिला अधिकाऱ्याला लाचप्रकरणात अटक

Byjantaadmin

Nov 28, 2022

नांदेड:-भ्रष्टाचारावर आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या आणि भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ अशी ओळख असणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कुंपनच शेत खातंय या म्हणीचा प्रत्यय आला आहे. नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाच आता भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी दोन मध्यस्थांमार्फत लाच मागणाऱ्या महिला पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. मीना बकाल असे या निरीक्षकाचे नाव असून त्यांच्या पतीलाही अटक करून या दोघांचीही रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर येथील खाजा मगदूम शेख यांच्या भाऊ शेख मेहराज यांचा कंधार येथील तहसील कार्यालयासमोर कागदपत्रे तयार करून देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या भावाला एसीबी कार्यालयातून तुमच्या विरोधात तक्रार आली असून त्याची चौकशी करण्यासाठी बोलाविण्यात आले आहे, असं सांगण्यात आलं होतं. ही बाब त्यांनी खाजा मगदूम शेख यांना सांगितली. त्यानंतर शेख यांना सय्यद शकील सय्यद अजीमसाब आणि सय्यद इस्माईल सय्यद अजीम या दोघांनी संपर्क साधून कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली.

या प्रकरणी खाजा मगदूम शेख यांनी मुंबई आणि नंतर औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली होती. 21 नोव्हेंबर रोजी सापळा रचून दोघांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एसीबीने पोलिस निरीक्षक मीरा बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावसकर या दोघांना अटक केली. बकाल यांनी मध्यस्थाकडून या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले असून तक्रारदाराच्या भावाला वेगवेगळ्या क्रमांकावरुन आलेल्या कॉलची तपासणी करण्यात आली होती. दरम्यान, पोलिस निरीक्षक मीरा बकाल, कुलभूषण बावसकर आणि इतर दोघांना  न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बकाल वर्षभरापासून नांदेडात
पोलिस निरीक्षक मीरा बकाल या 2012 साली पोलिस खात्यात रुजू झाल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या नांदेडच्या एसीबी यूनिट येथे कार्यरत होत्या. त्यांच्यावर भ्रष्टाचाराला आळा घालण्याची जबाबदारी असताना त्यांनीच तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याने कुंपणच शेत खात असल्याचं उदाहरण समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed