मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी पडल्यानंतर अजित पवारांनी सातत्याने शरद पवारांच्या वयावर टीका करत आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) या टीकेनंतर शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याचा न मोठा निर्णय घेतला आहे. खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे. त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही हे मी ठरवलं आहे. माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे. त्यामुळं मी तोपर्यंत काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथं पाठवलंय तिथं मी काम करु नको का? माझ्या वयावर सातत्यानं बोललं जाते. मी 1967 पासून राजकारणात आहे . माझ्या विरोधकांनीही कधी यावर टीका केली नाही. मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे . तिथं मी काम करत राहणार आहे.
देवेंद्र फडणवीसांना निकाल माहिती आहे : शरद पवार
राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा, राहुल नार्वेकरांनी प्रतिमा जपली पाहिजे. देवेंद्र फडणवीस उद्याच्या निकालानंतर सरकार स्थिर राहील असं जर म्हणत असतील याचा अर्थ त्यांना निकालाबाबत माहिती आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे, असा सल्ला शरद पवारांनी नार्वेकरांना दिला आहे.
गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही: शरद पवार
राम श्रद्धेचा विषय आहे. पक्षांकडून कोणतही रामाबाबत वक्तव्ये केलेलं नाही. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य पक्षाचं वक्तव्य नाही. मुंबईचे पालकमंत्री शाळांमध्ये रामाबाबत स्पर्धा घेण्यासाठी सक्ती करत आहेत हे योग्य नाही. हा देश सेक्युलर देश आहे . मी गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही. माझी राज्यसभेचा कार्यकाळ अडीच वर्षानंतर संपत आहे त्यानंतर जाईल, असे शरद पवार म्हणाले.
सरकार बदलत नाहीत तोवर असे छापे सुरूच राहणार : शरद पवार
विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या ईडीच्या छापेमारीवर बोलताना शरद पवार म्हणाले, केंद्रातलं सरकार बदलत नाहीत तोवर असे छापे सुरूच राहणार आहे.