• Thu. May 1st, 2025

तलाठी भरती वादाच्या भोवऱ्यात! मिळाले 200 पैकी चक्क 214 गुण; निकालाचे फोटो व्हायरल

Byjantaadmin

Jan 8, 2024

नुकताच निकाल जाहीर झालेली तलाठी भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका उमेदवाराला वनरक्षक परीक्षेत 54 गुण आणि 15 दिवसांनी झालेल्या तलाठी परीक्षेत त्याच उमेदवाराला 200 पैकी चक्क 214 गुण मिळाल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या निकालाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाच्या SIT चौकशीची मागणी केली आहे.

तलाठी भरती वादाच्या भोवऱ्यात! मिळाले 200 पैकी चक्क 214 गुण; निकालाचे फोटो व्हायरल,  SIT चौकशीची मागणी

तलाठी भरती परीक्षेचा निकाल ५ जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. तसेच भूमी अभिलेख विभागाने ६ डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका जाहीर केली होती. यानंतर स्पर्धा परिक्षा समन्वय समितीने या निकालावर आक्षेप घेत यात सध्याचा सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

“तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतेय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलाय, हे आता स्पष्ट होत आहे,” असे वडेट्टीवार यांनी त्यांच्या ‘एक्स’पोस्टमध्ये म्हटले आहे.स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेल्या आरोपांनुसार,”हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षकमध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच, या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या, आपल्याला फक्त एमपीएससीच देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससीकडे देणार, इथे सरळसेवामध्ये फक्त घोटाळेच होणार”, असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीने केला आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे तलाठी भर्ती वादात सापडली आहे. अनेकांकडून भरती रद्द करुन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. तर, सरळसेवेमार्फत परीक्षा न घेता एमपीएससी मार्फत परीक्षा घेण्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *