• Wed. Apr 30th, 2025

२२ जानेवारीला दिवाळी साजरी करु, ‘त्या’ कुटुंबांना एक-एक हजार द्या, प्रकाश आंबेडकरांची मोदींकडे मागणी

Byjantaadmin

Jan 8, 2024

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांकडे महत्त्वाची मागणी केली आहे. आम्ही २२ तारखेला दिवाळी साजरी करायला तयार आहोत, पण दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दिवाळी साजरी करण्यासाठी एक- एक हजार रुपये द्यावेत, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

Prakash Ambedkar Narendra Modi 900
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले का? असा प्रश्न पत्रकारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना विचारला. “मी वर्तमानपत्रातून वाचतोय की मला आमंत्रण येणार आहे. मला आतापर्यंत कुठलंही आमंत्रण आलेलं नाही, पण मी वाट पाहतोय” असं ते म्हणाले.”दुसरं म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे, की त्या दिवशी देशभरात दिवाळी साजरी करा. मोदींनी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं मिशन आपण सगळ्यांनी मान्य केलं, तसं हेही आम्ही मान्य करु, फक्त आमची मोदींना एवढीच विनंती आहे, की दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्यांनी एक- एक हजार रुपये द्यावेत, जेणेकरुन त्यांना दिवाळी साजरी करता येईल” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनी त्यांच्याच पैशातून दिवाळी साजरी करायची, असं त्यांचं (मोदी) म्हणणं असेल, आणि म्हणून संबंधित कुटुंबानी तशी दिवाळी साजरी केली, तर त्यांच्या मुलांना महिन्याभरात गोड-धोड खाताना त्याग करावा लागेल अशी परिस्थिती आहे. पंतप्रधानांच्या या इच्छापूर्तीसाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एक- एक हजार रुपये द्यावे” अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *