राष्ट्रवादीचे ९९ टक्क्यांहून अधिक कार्यकर्ते अद्यापही शरद पवार यांच्या सोबत आहेत : संजय शेटे
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडल्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी त्यात काहीच तथ्य नाही. कारण अद्यापही ९९ टक्क्यांहून अधिक कार्यकर्ते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सोबतच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी रविवारी लातुरातपत्रकारांशी बोलताना केले.
अजित पवारांसोबत गेलेल्या बोटांवर मोजण्याइतपत कार्यकर्त्यांमुळे पक्षात फूट पडली असे म्हणणे बालिशपणाचे आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नसून अजितदादा मित्र मंडळ असल्याची खिल्ली उडवून संजय शेटे पुढे म्हणाले की, शरद पवार एक व्यक्ती नसून एक विचार – शक्ती आहेत. त्यामुळेच आपण अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या आधीपासूनच त्यांच्या सोबत कार्य करत आहोत. लातूर जिल्ह्यात आजपावेतो राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे मजबूत होऊ शकली नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी बहुसंख्य करणे सर्वज्ञात आहेत. त्यामुळे आज आपण त्यावर कोणतेही भाष्य न करता केवळ एवढेच सांगू इच्छितो की, आजपर्यंत जे राष्ट्रवादीच्या बाबतीत घडले ते यापुढील काळात घडणार नाही. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पार्टीचे संघटन वाढविण्यासाठी आपण जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन सर्वतोपरी उपाययोजना करणार आहोत.
जिल्ह्यातील कार्यकर्ते अजूनही पूर्ण ताकदीनिशी शरद पवार यांच्या पाठीशी आहेत, याची प्रचिती आपणास नुकत्याच पार पडलेल्या पार्टीच्या पहिल्याच बैठकीत आली. आपण लवकरच जिल्ह्याचा दौरा करून पार्टीची जिल्हा कार्यकारिणी घोषित करणार आहोत. तसेच पार्टीच्या निर्णयानुसार दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पार्टीचे नेते, आपण स्वतः एक तास राष्ट्रवादीसाठी या धोरणानुसार पक्षवृद्धीसाठी प्रयत्नशील राहणार आहोत. येणाऱ्या नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद – पंचायत समिती , विधानसभा निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण शक्तीनिशी लढवणार आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि अहमदपूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आपण विक्रमी मतांनी निवडून आणणारच असा दावाही संजय शेटे यांनी केला.
पक्ष संवर्धनाबरोबरच शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करणे, शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे, जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण रोखणे ,शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलने करणे यासाठीही आपण सातत्याने पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार शिवराज तोंडचिरकर, जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब पाटील, रशीद शेख, शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, भरत सूर्यवंशी, रेखाताई कदम,निशांत वाघमारे, स्नेहा मोटे, बक्तावर बागवान,सुधीर साळुंखे, परमेश्वर पवार, बस्वराज रेकुळगे, आर.झेड. हाश्मी, इरफान शेख, , सय्यद फेरोज, उमाकांत ढावारे आदींची उपस्थिती होती.