काश्मीर ते कन्याकुमारी असा दक्षिणोत्तर विविधतेत एकता सामावलेल्या या खंडप्राय देशात काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेतून देशातील संस्कृती आणि परंपरा दिसून आली. याच यात्रेतून राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या अनेक आरोपांना सुद्धा उत्तर मिळाले. भाजपकडून पहिल्यांदा दुर्लक्ष आणि नंतर घेतलेला धसका सुद्धा याच यात्रेनं पाहिला. यामध्ये राजकीय आरोपांची चिखलफेक सुद्धा झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Loksabha Election) आता 14 जानेवारीपासून काँग्रेस भारत जोडो यात्रा 2.0 काढणार आहे. या यात्रेचं नाव पहिल्यांदा भारत न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) असे देण्यात आले. मात्र, ते नाव बदलून पुन्हा भारत जोडो न्याय यात्रा असे करण्यात आले. 14 जानेवारीला इंफाळ येथून सुरू होणारी यात्रा 15 राज्यांतील 110 जिल्हे पार करणार आहे. 100 लोकसभा मतदारसंघांमध्ये ही यात्रा स्पर्श करणार आहे. याच 15 राज्यांमध्ये मिळून 357 लोकसभेच्या जागा (एकूण 545 पैकी) आहेत. या यात्रेचा शेवट देशाच्या राजकारणात पार खिचडी होऊन गेलेल्या महाराष्ट्रात अर्थात मायानगरी अन् देशाची आर्थिक राजधानी असलेल्या MUMBAIत होईल.
66 दिवसांच्या प्रवासात सर्वाधिक टार्गेट उत्तर प्रदेश
भारत जोडो न्याय यात्रा लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आखण्यात आल्याने काँग्रेसकडून याच यात्रेतून प्रचाराचा नारळ सुद्धा फोडला जाईल, यात शंका नाही. त्यामुळे राम मंदिर सोहळ्यातून भाजपचा प्रचार सुरु केला असतानाच काँग्रेसकडून सुद्धा प्रचार शुभारंभ केला जाईल. यात्रा तब्बल 66 दिवस रस्त्यावर असेल. यामध्ये सर्वाधिक 11 दिवसांची सर्वात मोठी यात्रा उत्तर प्रदेशात असेल. याच उत्तर प्रदेशातून लोकसभेचा मार्ग प्रशस्त होत असतो. त्यामुळे यात्रा करताना सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेशात केंद्रित करण्यात आलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी प्रतिनिधित्व केलेल्या रायबरेली लोकसभा मतदारसंघ आणि अमेठी या दोन्ही मतदारसंघांना सुद्धा स्पर्श करेल, ज्यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या यात्रेतून भाजपच्या उत्तर प्रदेशातील हिंदुत्वाच्या राजकारणात काँग्रेस आव्हान निर्माण करणार का? याचीही चर्चा सुरु झाली आहे.
उत्तर प्रदेशात अयोध्या थांबा नाही!
उत्तर प्रदेशात यात्रा वाराणसी येथून प्रवेश करणार आहे त्यानंतर नंतर प्रयागराज, अमेठी, रायबरेली, लखनौ, बरेली, अलीगढ आणि आग्रा येथे जाईल. उत्तर प्रदेशात 20 जिल्ह्यांमध्ये एकूण 1,074 किमी अंतर कापेल. 22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा (मूर्ती प्रतिष्ठापना) सोहळ्यापासून सुरुवात होणार्या भाजपच्या निवडणूक प्रचाराचा केंद्रबिंदू बनलेल्या अयोध्येतून ही यात्रा जाणार नाही. या दिवशी ही यात्रा आसाममध्ये असेल.

यूपीनंतर, आसाम आणि झारखंडमध्ये सर्वाधिक आठ दिवस यात्रा आहे. ही यात्रा मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक दिवस असेल. मणिपूरमध्ये ही यात्रा एका दिवसात 107 किमी अंतर पार करेल. काँग्रेसच्या सूत्रांनी असा दावा केला आहे की त्यांच्याकडे आत्तापासूनच यात्रा सुरू करण्यासाठी सुरक्षा परवानगी आहे.
हिंदी भाषिक राज्यात भाजप वरचढ
दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 3-1 ने बाजी मारताना आगामी लोकसभेला किमान 82 जागांसाठी पोषक वातावरण तयार केलं आहे. भाजपने चारपैकी हिंदी भाषिक असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवला. यामध्ये राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तांतर करत भाजपने सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशात सत्ता कायम ठेवली आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशसह उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या हिंदी भाषिक राज्यामध्ये भाजपने आपला दावा मजबूत केला आहे. मात्र, दुसरीकडे, कर्नाटक तेलंगणात सुद्धा भाजपची झोळी रिकामी राहिल्याने उत्तर भारतातून भाजप हद्दपार झाला आहे.
दक्षिण भारतात भाजप हद्दपार, उत्तर भारतात काँग्रेस हद्दपार!
उत्तर भारतामध्ये केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडून बस्तान बसवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. मात्र, पहिल्यांदा कर्नाटक आणि आता तेलंगणा अशा दोन राज्यांनी भाजपचा डाव धुळीस मिळवला आहे. या दोन्ही राज्यात काँग्रेसने सत्ता मिळवताना दक्षिणेकडील स्थान अधोरेखित केलं आहे. त्यामुळे उत्तर भारतातून काँग्रेस हद्दपार अन् दक्षिणेतून भाजप हद्दपार अशी स्थिती दोन प्रमुख पक्षांची झाली आहे. उत्तर भारतात एकट्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. याशिवाय बिहार (40), मध्य प्रदेश (29), राजस्थान (25) आणि हरियाणा (10) या राज्यांचा विचार केल्यास लोकसभेच्या जागांची संख्या 184 वर पोहोचते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतातील 184 पैकी 141 जागा एकट्या भाजपच्या वाट्याला गेल्या. गुजरातमधील 26 पैकी 26, दिल्लीतील 7 पैकी 7, हिमाचलमधील 4 पैकी 4 आणि महाराष्ट्रातील 48 पैकी 23 जागा जोडल्यास भाजपला 201 जागा मिळाल्या.
यावेळी महाराष्ट्रात काय होणार?
चारपैकी तीन राज्यातील विजयाने भाजपला 82 जागांवर आत्मविश्वास आला असला, तरी महाराष्ट्रात राजकारणाची झालेली खिचडी पाहता यावेळी भाजपसमोर तगडं आव्हान असणार आहे. आज भाजप सत्तेत असला, तरी सर्वाधिक मर्जी अजित पवार आणिSHINDE गटाची सांभाळावी लागत आहे. येत्या लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट मुकाबला असेल. त्यामुळे 2019 ची पुनरावृत्ती लोकसभा आणि विधानसभेला होईल की नाही? याबाबत कोणतीही श्वाश्वती नाही.महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून 27 महानगरपालिका, 230 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. अजून दोनच महिन्यांनी काही महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडून तब्बल चार वर्ष झालेली असतील. यावरून MAHARASHTRA ातील स्थितीचा अंदाज येतो. दक्षिण भारताचा विचार करता, कर्नाटक व्यतिरिक्त भाजपला फक्त कर्नाटक (28 पैकी 25) आणि तेलंगणात (17 पैकी 4) जागा मिळाल्या. यावेळी कर्नाटकानंतर तेलंगणात काँग्रेसचा बंपर विजय या दोन्ही राज्यांमध्ये भाजपच्या जागा कमी होऊ शकतात तर काँग्रेसला फायदा होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे दक्षिणेतील वातावरण आणि यात्रेचा लाभ काँग्रेस आव्हान निर्माण करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.