मुंबई 28 नोव्हेंबर : रविवारी मुंबईमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी राज ठाकरे यांनी सावरकर, नेहरू वादावरून देखील सुनावलं. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधाला.
सावरकरांबद्दल बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी तरी आहे का? असा घणाघात राज ठाकरे यांनी होता. राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत, असं राज ठाकरे म्हणाले होते. यानंतर आता काँग्रेसने राज ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे आमचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळणारा भरघोस, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्याचाच राज ठाकरेंवर झालेला परिणाम आणि प्रभाव त्यामुळे ते विचलित झाले आहेत, असा टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी लगावला
एक व्यक्ती चालत संपूर्ण भारत जोडायला निघालेला आहे. त्यांना प्रत्येक राज्यात मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद, त्यांच्यासोबत सर्व क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, उद्योजक तसेच सामान्य जनता स्वतःहून जोडली जात आहे. हे कदाचित राज ठाकरे यांना बघवत नाही. कारण राज ठाकरे कधी बाहेर पडले नाहीत, फिरले नाहीत. भारत तर सोडा महाराष्ट्र ही त्यांनी संपूर्णपणे पाहिला नसेल, असा टोला भाई जगताप यांनी लगावला.
पुढे ते म्हणाले, की मनसे हा संपलेला पक्ष आहे आणि राज ठाकरे यांच्या वेळोवेळी भूमिका बदलत असतात म्हणून लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. राज ठाकरे यांनी इतरांच्या मेंदूविषयी बोलण्याआधी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. त्यांनीच आता आपला मेंदू भाजप आणि मिंधे सरकारकडे गहाण ठेवलेला आहे. म्हणून सुपारी घेऊन राहुल गांधी यांच्यावर टीका केलेली आहे. हे आजच्या भाषणाने दिसून येत आहे, असा आरोपही त्यांनी केला. राज ठाकरे हे कलाकार आहेत म्हणून त्यांना राहुल गांधी यांच्या आवाजात आर डी बर्मनच दिसणार. नाही तरी ते सध्या सिनेमामध्ये आवाज देण्याचं कामच तर करत आहेत, असा टोलाही जगताप यांनी लगावला.