• Tue. Apr 29th, 2025

नाशिकला होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Byjantaadmin

Jan 4, 2024

मुंबई : नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री आणि सचिवांसोबत झालेल्या आढावा बैठकीत  दिली. महोत्सवाच्या तयारीकरीता समन्वय मंत्रीअधिकारी नियुक्त करण्यात आले असून नाशिक येथे त्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या आयोजनात कुठलीही कसर राहणार नाही. महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातील युवा वर्गाला महाराष्ट्राची संस्कृतीलोककला याविषयीची नव्याने ओळख करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त होणाऱ्या या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महोत्सवाच्या तयारीची माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमुख्य सचिव डॉ. नितीन करीरक्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ताकेंद्रीय सचिव मीता राजीव लोचन आदी यावेळी उपस्थित होते.

नाशिक येथे दिनांक १२ जानेवारीला या राष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. सोहळ्यासाठी सुमारे लाखभर युवक – युवती उपस्थित राहण्याचा अंदाज असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मंत्रनगरी ते यंत्रनगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये देशभरातील युवा वर्गाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला असून महोत्सवाच्या आयोजनात कुठलीही उणीव भासणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. आयोजनासाठी तयार करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या माध्यमातून समन्वय करण्यात येत आहे. विविध माध्यमांद्वारे महोत्सवाची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed