• Tue. Apr 29th, 2025

ट्रकने बसला धडक दिल्याने भीषण अपघात, १२ प्रवाशांचा मृत्यू; २५ जण जखमी

Byjantaadmin

Jan 3, 2024

आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात बुधवारी सकाळी प्रवासी बस आणि ट्रकच्या धडकेत पाच महिला आणि एका अल्पवयीन मुलासह १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना राष्ट्रीय महामार्ग 37 वरील डेरगाव येथे पहाटे 5 वाजता घडली.

सुमारे ४५ प्रवाशांनी भरलेली बस गोलाघाटहून तिनसुकियाच्या दिशेने जात होती. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळशाने भरलेल्या ट्रकची त्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रक आणि बस दोन्ही चालकांचा मृत्यू झाला.

जखमींना डेरगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गंभीर जखमींना जोरहाट वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जेएमसीएच) नेण्यात आले आहे.

गोलाघाटचे उपायुक्त पी उदय प्रवीण म्हणाले, “एका बाजूला रस्त्यांची दुरुस्ती सुरू होती आणि त्यामुळे दोन्ही दिशांची वाहने दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूचा वापर करत होती. ट्रक वेगाने येत होता त्यावेळी नियंत्रण सुटल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

बसमधील बहुतांश प्रवासी भारलुखुवा गावातील होते. ते तीनसुकिया येथील तिलिंगा मंदिरात जात होते. तेथून ते बोगीबील येथे पिकनिकला जात होते. यावेळी हा अपघात झाला.

 

गोलाघाटचे पोलिस अधीक्षक राजेन सिंह म्हणाले, “आम्ही बस आणि ट्रकमधून 10 मृतदेह बाहेर काढले आहेत. जेएमसीएचमध्ये दाखल झालेल्या 27 जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed