• Tue. Apr 29th, 2025

…तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाबाबत हालचाल नाही, किसान सभेचा आंदोलनाचा इशारा

Byjantaadmin

Jan 2, 2024

दूध उत्पादकांना दूधदराबद्दल दिलासा देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान दिले जाईल अशा प्रकारची घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहामध्ये केलेली होती. एक जानेवारीपासून नवीन मस्टर सुरू झाले असले तरी दूध अनुदानाबाबत हालचाल झाली नसल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. अनुदान आणि इतर मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास पुन्हा राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे. राज्यात 1 जानेवारीपासून दूध संकलनाचे नवीन मस्टर सुरू होते. या मस्टरमध्ये तरी दूध उत्पादकांना अशाप्रकारे अनुदान मिळेल अशी अपेक्षा दूध उत्पादक शेतकरी बाळगून होते. मात्र 1 जानेवारी उलटून गेली आणि नवीन मस्टर सुरू झाले तरीसुद्धा अद्याप अशा प्रकारचं अनुदान शेतकऱ्यांना देण्याबद्दल हालचाल झालेली नाही. अनुदानाची फाईल अर्थ विभागाकडेच पडून असून याबाबत अर्थ विभागाचा व मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्याशिवाय  शासनआदेश सुद्धा काढला जाणार नाही, अशा प्रकारची माहिती समोर आली असून ही गंभीर बाब असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटले.

सरकारची भूमिका शेतकरी विरोधी

शेतकरी अडचणीत असताना अनुदान द्यायचे नाही आणि मार्च दरम्यान लीन सीजन सुरू झाल्यानंतर जेव्हा आपोआप दुधाचे दर वाढतात तेव्हा अनुदान देण्याबाबत भूमिका घ्यायची हा सरकारचा वेळकाढूपणा शेतकरी विरोधी आणि दुध व्यवसायाला अत्यंत मारक असल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.  सरकारने अधिक अंत न पाहता उद्या किंवा परवा होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत अंतिम निर्णय करावा. सहकारी दूध संघांबरोबरच खाजगी दूध संघांना दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रतिलिटर पाच रुपयाचे अनुदान देण्याबाबतचा निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रति लिटर 34 रुपयाचा दर देणे खाजगी व सहकारी दूध संघांना बंधनकारक करावं तसच पशुखाद्याचे दर कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशा प्रकारची मागणी किसान सभेने पुन्हा एकदा केली आहे. सरकारने याबाबत उद्याच्या बैठकीमध्ये ठोस निर्णय न घेतल्यास पुन्हा एकदा महाराष्ट्रभर आंदोलन उभे करण्याचा निर्णय किसान सभा जाहीर करत आहे.

सर्वांनाचं दूध अनुदान देण्याची किसान सभेची मागणी MAHARASHTRA तील 72 टक्के दूध हे खासगी संस्थांना घातलं जातं. त्यामुळं 72 टक्के शेतकरी सरकारनं घेतलेल्या दूध अनुदानाच्या निर्णयापासून वंचित राहणार असल्याचे अजित नवले म्हणालेत. हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.  सरकारनं भेदभाव करु नये. सरकारनं खासगी आणि सहकारी दूध संस्थांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपयांचे अनुदान द्यावे अश मागणी अजित नवलेंनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed