• Mon. Apr 28th, 2025

विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी प्रत्येक शाळांनी  अग्रसंधनी कार्यशाळेचे आयोजन करावे – वैशाली देशमुख

Byjantaadmin

Jan 2, 2024
विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी प्रत्येक शाळांनी  अग्रसंधनी कार्यशाळेचे आयोजन करावे : वैशाली देशमुख
लातूर : विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी  केवळ लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर विभाग – राज्यभरातील प्रत्येक शाळांनी अग्रसंधनी कार्यशाळेचे आयोजन करणे अत्यंत   आवश्यक असल्याचे प्रतिपादन कौशल्या अकादमीच्या संचालिका वैशाली देशमुख यांनी केले.
     आपले मूल ही चांगली व्यक्ती  म्हणून घडावी असे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते व ते वास्तावात उतरावे यासाठी ते  सतत धडपडत असतात.  परंतु ते मूल एक चांगला व्यक्ती म्हणून घडण्याबरोबरच एक चांगला विद्यार्थी म्हणून ही बनला पाहिजे. त्यासाठी त्याला अभ्यासाची योग्य दिशा मिळणे गरजेचे असते हे सारे कसे साध्य करावे?  यासाठीचा मंत्र  अग्रसंधनी कार्यशाळेत मिळतो.   त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित, यश व त्यांच्या भवितव्यासाठी  अशा कार्यशाळा  प्रत्येक शाळांनी घ्याव्यात असे आवाहन कौशल्या अकादमीच्या संचालिका वैशाली देशमुख यांनी केले. विद्यार्थ्यांना शिकवत असताना वर्गात  शिक्षकांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांबाबत माहिती देऊन त्यांनी विद्यार्थी कसा असावा ? यासंदर्भातील गुरु द्रोणाचार्य व युधिष्ठिर  यांचा एक पौराणिक किस्साही त्यांनी विद्यार्थ्यांना कथन केला. आजच्या शिक्षण प्रणालीत  अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर अधिक भर दिला जात असल्याचे दिसून येते. पण विद्यार्थ्यांना जे काही शिकवले गेले आहे, ते समजलेय  का, अंगवळणी पडलेय का हे पाहिले  जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुले स्वतःच्या चुका कबूल  करत नाहीत. अशा परिस्थितीत अभ्यासातील चुकाही कबूल  करत नसतात असे सांगून त्यांनी अग्रसंधनी  दैनंदिनी – कार्यशाळेच्या  माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे परिपूर्ण केले जाऊ शकते याचे विवेचन केले.
लातूर शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल , शारदा इंटरनॅशनल स्कूल,बसवणप्पा वाले इंग्लिश स्कूल,श्री श्री रविशंकर विद्या मंदिर,श्री केशवराज विद्यालय,श्री देशिकेंद्र विद्यालय आणि सनराईज इंग्लिश स्कूल या शाळांमध्ये वैशाली देशमुख यांनी या  अग्रसंधनी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले. पालकांनी मुलांचे योग्य परीक्षण केले तरच मुलांच्या चुका शोधणे आणि  त्या समजून घेऊन त्यावर काम करणे सोपे जाते. चुका समजून घेऊन सुधारणा केल्या तरच मुलांचे पाऊल हे यशाच्या मार्गावर मार्गावर पडेल. अभ्यासक्रम संपवणे महत्त्वाचे नसून,अभ्यासाची शिस्त लागणे,चांगल्या सवयी अंगी रुजवणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे देशमुख म्हणाल्या. शहरातील विविध शाळांत घेण्यात आलेल्या  या कार्यशाळांना विद्यार्थ्यांनी  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  .
  अग्रसंधनी कार्यशाळा ही प्रामुख्याने विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त आणि स्वयं मूल्यमापन याचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतली जाते.जेईई  – नीट सारख्या मोठ्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारी तयारी ही शालेय अवस्थेपासूनच या कार्यशाळेमार्फत करवून घेतली जाते. शालेय परीक्षा जवळ आलेल्या असताना,विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य दिशा मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक शाळेत अग्रसंधनी कार्यशाळा घेण्यात यावी, असे आवाहन यावेळी वैशाली देशमुख यांनी केले. वैशाली देशमुख ह्या शिक्षण क्षेत्रात  शैक्षणिक कौशल्य प्रशिक्षक म्हणून ओळखल्या जातात. विद्यार्थ्यांना त्यांचे यश मिळविण्यासाठी , त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्याकामी मदत करणाऱ्या एक मार्गदर्शक म्हणूनही त्या सर्वज्ञात आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने भावी पिढीचे भवितव्य निश्चितच उज्वल असणार असल्याच्या प्रतिक्रिया अध्यापक तसेच पालकातून ऐकावयास मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed