बंगळुरू: आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गॅस गीझर लीक झाल्यानं श्वास गुदमरुन तिचा मृत्यू झाला. राजेश्वरी असं तिचं नाव असून ती २३ वर्षांची होती. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील कामाक्षीपालय परिसरात ही घटना घडली.
मिनाक्षी नगरात राहणारी राजेश्वरी तिच्या भावाच्या लग्नानिमित्त सुट्टीवर होती. काल सकाळी ती आंघोळीला गेली. तेव्हा गॅस गीझर लीक झाल्यानं ती बेशुद्ध पडली. राजेश्वरी बराच वेळ बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत पडून होती. श्वास गुदमरल्यानं तिचा मृत्यू झाला. राजेश्वरी बराच वेळ बाथरुममधून बाहेर न आल्यानं कुटुंबियांनी दार ठोठावलं, आवाज दिला. पण आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.कुटुंबियांनी दार ढकलून बाथरुममध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांना राजेश्वरी बेशुद्धावस्थेत सापडली. त्यांनी तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी राजेश्वरीला मृत घोषित केलं. या घटनेमुळे लग्नघरावर शोककळा पसरली. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या प्रकरणाची नोंद कामाक्षीपालय पोलिसात करण्यात आली आहे.अशाच प्रकारची घटना बंगळुरूच्या एका गर्भवतीसोबतदेखील घडली. आपल्या ४ वर्षीय मुलासोबत आंघोळ करताना राम्याचा (२३) मृत्यू झाला. बंगळुरूच्या अश्वथ नगरमध्ये ही घटना घडली. राम्या तिच्या ४ वर्षीय मुलासोबत आंघोळ करत असताना गॅस गीझरमधून विषारी कार्बन मोनोऑक्साईड लीक झाला. त्याबद्दल अनभिज्ञ असलेला लेक बाथरुममध्ये गेला. तो बेशुद्ध होऊन पडला.कुटुंबियांनी दोघांना घेऊन रुग्णालय गाठलं. मात्र उपचारदम्यान तिचा मृत्यू झाला. राम्याच्या गर्भात असलेल्या मुलाचाही मृत्यू झाला. राम्याच्या ४ वर्षीय मुलावर उपचार सुरू आहेत. त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. या प्रकरणी सदाशिव नगर पोलीस ठाण्यात कुटुंबियांनी तक्रार नोंदवली आहे.